Indian Mens Cricket Team has arrived at the Athlete’s Village: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ पोहोचला आहे. टीम इंडिया ३ ऑक्टोबर रोजी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. ॲथलीट्स व्हिलेजमध्ये पोहोचलेल्या भारतीय संघाचे फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण टीम एकत्र दिसत आहे.
१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाने महिला क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. पुरुष संघाकडूनही अशाच कामगिरीची सर्व चाहत्यांना अपेक्षा आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ मुळे, आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेलेल्या भारतीय संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा या खेळाडूंचा समावेश आहे. ज्यांनी आयपीएलमधील आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले होते.
भारतीय संघाबद्दल बोलायचे तर त्यात ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग आणि तिलक वर्मा यांचाही समावेश आहे, ज्यांनी यावर्षी आतापर्यंत टी-२० फॉरमॅटमध्ये बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोलंदाजी विभागात आवेश खान, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार यांच्या नावांचा समावेश आहेत.
हेही वाचा – Ravichandran Ashwin: माजी खेळाडूचे आश्विनबाबत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाला, “जर CSK आणि MSD नसते, तर त्याला…”
भारत-पाकिस्तान हॉकी सामना पाहण्यासाठी क्रिकेट संघाचे खेळाडू होते उपस्थित –
आशियाई क्रीडा स्पर्धेत, ३० सप्टेंबर रोजी हॉकी पूल-ए मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय हॉकी संघाची जबरदस्त एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली, ज्यात त्यांनी १०-२ अशा फरकाने ऐतिहासिक विजय नोंदवला. यावेळी हॉकी संघाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडूही स्टेडियममध्ये उपस्थित होते, ज्यात रिंकू सिंग, यशस्वी जैस्वाल, अर्शदीप सिंग, कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांचा समावेश होता.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघ –
यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, तिलक वर्मा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि आकाशदीप सिंग.