बंगळुरुमधील ‘साई’ (Sports Authority of India) च्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या ३ सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला आहे. ४-२ च्या फरकाने न्यूझीलंडवर मात करुन भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. सामन्यात भारताकडून रुपिंदरपाल सिंह (२ रे, ३४ वे मिनीट), मनदीप सिंह (१५ वे मिनीट) आणि हरमनप्रीत सिंह (३८ वे मिनीट) यांनी गोल केले. न्यूझीलंडकडून स्टिफन जेनीसने २६ व ५५ व्या मिनीटाला गोल केले.
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाने सामन्यात आक्रमक सुरुवात केली. पहिल्या काही मिनीटातच पेनल्टी कॉर्नर मिळवत भारताने दुसऱ्या मिनीटालाच आघाडी घेतली. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दुखापतीनंतर संघाबाहेर गेलेल्या रुपिंदरपालने दणक्यात पुनरागमन करत भारताला आघाडी मिळवून दिली. यानंतर न्यूझीलंडला ७ व्या मिनीटामध्ये सामन्यात बरोबरी साधण्याची संधी आली होती, मात्र गोलकिपर क्रिशन बहादूर पाठकच्या बचावामुळे ही संधी वाया गेली.
१५ व्या मिनीटाला मनप्रीत सिंहने दिलेल्या पासवर मनदीपने बॉलला सुरेख जागा दाखवत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आक्रमणाऐवजी बचाव करण्यावर भर दिला. अखेर २६ व्या मिनीटाला स्टिफन जेनीसने सुरेख मैदानी गोल करत भारताची आघाडी २-१ अशी कमी केली. मात्र मध्यांतरानंतर एस. व्ही. सुनीलने निर्माण केलेल्या संधीवर रुपिंदरपालने पुन्हा एकदा भारताला पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन दिला. या गोलमुळे भारताने सामन्यात ३-१ अशी आघाडी घेतली.
यानंतर हरमनप्रीत सिंहने ३८ व्या मिनीटाला भारताची आघाडी ४-१ ने वाढवली. अखेरच्या सत्रात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आक्रमण करत भारताशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय बचावफळीसमोर त्यांची डाळ शिजली नाही. अखेर स्टिफन जेनिसने ५५ व्या मिनाटाला आणखी एक गोल करत आपल्या संघाला दुसरा गोल केला, मात्र तोपर्यंत सामन्यावर भारताचं वर्चस्व तयार झालं होतं. या मालिकेतला दुसरा सामना २१ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजता होणार आहे.