वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा यांनी आपल्याच सदस्यांना बजावलेली कारणे दाखवा नोटीस, त्यानंतर आलेली धमक्यांची पत्रे आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान झालेला अतिरिक्त खर्च हे आणि इतर अनेक वादग्रस्त मुद्दे गुरुवारी होणाऱ्या ‘आयओए’ कार्यकारी परिषदेच्या बैठकीत चर्चेच्या केंद्रस्थानी असतील.

कार्यकाळ संपूनही संघटनेवर कार्यरत असलेल्या सदस्यांविरोधात उषा यांनी काढलेल्या नोटिशीत कोषाध्यक्ष सहदेव यादव यांचा समावेश असून, त्यांनी या संदर्भात थेट बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारची नोटीस काढल्यापासून उषा आणि सहदेव यादव यांच्यातील संबंध तणावाचे राहिले असून, याच पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे.

हेही वाचा >>>ICC कसोटी क्रमवारीत विराट-रोहितला मोठा फटका! यशस्वी टॉप-५ मध्ये दाखल तर ऋषभचे दमदार पुनरागमन

भारतीय वेटलिफ्टिंग महासंघावरील १२ वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही सहदेव संघटनेतील पद सोडण्यास तयार नाहीत. या मुद्द्याला धरून उषा यांनी मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेत सहदेव यांच्या ‘आयओए’तील पात्रतेला आव्हान दिले होते. मात्र, या संदर्भातील पत्र सहदेव यादव यांना मिळण्यापूर्वीच प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले. त्यामुळे सहदेव यादव संतप्त झाले असून, त्यांनी बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

‘आयओए’च्या बैठकीत एकूण १४ विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये अध्यक्षांनी सदस्यांना वेळोवेळी दिलेली सूचना पत्रे आणि त्यावर उमटलेल्या प्रतिक्रिया, हा विषय सर्वांत प्राधान्याने चर्चेत येईल. ‘आयओए’च्या घटनेनुसार अध्यक्षांना असलेल्या अधिकारांची व्याप्ती, अध्यक्षांच्या वर्तनाचा अहवाल मागणे हे पूरक मुद्देही या वेळी पुढे येतील असे बोलले जात आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान झालेला अतिरिक्त खर्च आणि सर्वोत्तम गुणवत्तेच्या खेळाडूंची निवड व त्यांचा ‘आयओए’ निवडणुकीतील सहभाग यावरही चर्चा अपेक्षित आहे.