देशातील क्रीडा क्षेत्रात जो काही गोंधळ चालला आहे, त्याला भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (आयओए) जबाबदार आहे, असे मत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे. ‘‘देशातील विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांमध्ये जे काही गैरव्यवस्थापन चालले आहे, त्याला आयओएचे कमकुवत व्यवस्थापनच जबाबदार आहे. केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी याबाबत कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे. सर्व संघटनांचा कारभार कसा पारदर्शी होईल, याबाबत ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे,’’ असे पटेल यांनी सांगितले.
‘‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भ्रष्टाचारी संघटकांना पुन्हा संघटनांवर स्थान देऊ नये. काही मोजक्या संघटकांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात देशाची प्रतिमा ढासळली आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.