आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने ‘बॉक्सिंग इंडिया’ हीच भारताची अधिकृत राष्ट्रीय संघटना असल्याचे मान्य केले असले तरी भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) बॉक्सिंग इंडियाला आपली मान्यता नसल्याचे कळवित ठोसा मारला आहे.
बॉक्सिंग इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले,की आंतरराष्ट्रीय महासंघाच्या मान्यतेनंतर आम्ही महिलांची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धाही आयोजित केली. तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही आम्हाला अधिकृत संघटनेची मान्यता दिली आहे. मात्र आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आयओएने आम्हाला डावलले आहे. आयओएने त्रिलोचनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या अस्थायी समितीला झुकते माप दिले आहे. क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविण्याची जबाबदारी या समितीकडे सोपविली आहे. त्यामुळे अनेक राज्यांच्या बॉक्सिंग संघटनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय महासंघाच्या मान्यतेनंतर आम्ही रीतसर निवडणुकाही घेतल्या होत्या. त्यास महासंघाचा निरीक्षकही उपस्थित होता, असे असूनही आयओए आम्हाला मान्यता देण्यास तयार नाही. या संदर्भात आम्ही आयओएकडे अनेक वेळा पत्र पाठविले आहे मात्र त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.
भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघ (आयएबीएफ) हीच आयओएच्या दृष्टीने नोंदणीकृत संघटना आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाची मान्यता बॉक्सिंग इंडियास असली तरी या संघटनेस आयओए ही आयएबीएफची समांतर संघटना मानत आहेत. मात्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आयएबीएफला आपली मान्यता नसल्याचे यापूर्वीच कळविले आहे. चेन्नई येथे १९ डिसेंबर रोजी आयओएची वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. त्यामध्ये बॉक्सिंग इंडियाला मान्यता देण्याचा कोणताही ठराव मंजुरीसाठी ठेवण्यात आलेला नाही.

Story img Loader