भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन(आयओए)वर आता भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संघटकांना स्थान नाही. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओए) दबावापुढे झुकून भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने रविवारी घटना दुरुस्ती करीत या संघटकांना असोसिएशनाची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले आहे.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनवर सध्या बंदीची कारवाई झाली आहे. ही बंदी उठविण्यासाठी आयओसीने आयओएला गैरव्यवहार व अन्य आरोप असलेल्या संघटकांना निवडणूक लढविण्यास मनाई करण्याचा ठराव मंजूर करण्याचा आदेश दिला होता. ही दुरुस्ती १० डिसेंबरपूर्वी करण्याबाबत त्यांनी बंधन घातले होते. त्यामुळेच आयओएने विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. एस. रघुनाथन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला १३४ सदस्य उपस्थित होते.
रघुनाथन यांनी सांगितले, ‘‘गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संघटकांना आयओएची कोणत्याही पदाची निवडणूक लढविण्यास मनाई करण्याची घटना दुरुस्ती एकमताने मंजूर करण्यात आली. त्यामुळे असोसिएशनाचे अध्यक्ष अभयसिंह चौताला व सरचिटणीस ललित भानोत हे निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरणार आहेत. या दोघांनीही आपल्या पदाचे राजीनामेही दिले. घटनादुरुस्तीचा ठराव चौताला यांनी मांडला, तर भानोत यांनी त्यास अनुमोदन दिले.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘या ठरावानुसार भारतीय कायद्यानुसार जी व्यक्ती भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली दोषी असेल अशा व्यक्तीला आयओएचे पद स्वीकारता येणार नाही. जर ती व्यक्ती पदाधिकारी असेल तर तिला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. जर या व्यक्तीने राजीनामा देण्यास नकार दिला, तर अशा व्यक्तीला एका ठरावाद्वारे बडतर्फ केले जाईल. तसेच हे प्रकरण आयओएच्या नीतिमूल्य समितीकडे सोपविले जाईल.’’
आयओएच्या विविध पदांसाठी ९ फेब्रुवारी रोजी निवडणुका घेण्याचाही ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला, असेही रघुनाथन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘घटनादुरुस्तीमुळे आयओएवरील बंदी लवकरच उठविली जाईल. आयओसीने बंदी उठविण्यासाठी जी काही बंधने घातली होती त्यानुसार आम्ही सर्व अटींची पूर्तता केली आहे. आयओसीच्या कार्यकारिणीची बैठक १० व ११ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामध्ये या विषयाबाबत सविस्तर चर्चा होईल. कदाचित त्याच बैठकीत भारताविषयी अनुकूल निर्णय मिळेल किंवा आमची निवडणूक झाल्यानंतर ते बंदी उठवतील अशी अपेक्षा आहे.’’
‘‘चौताला व भानोत यांनी घाईघाईने आपल्या पदांचे राजीनामे देण्याची आवश्यकता नव्हती. मात्र त्यांनी आयओसीच्या निर्णयाचा आदर राखून ही कृती केली असावी,’’ असेही रघुनाथन यांनी सांगितले.
दरम्यान, चौताला यांनी आपण आयओएची निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘‘नवीन नियमानुसार आम्ही निवडणूक लढविण्यास अपात्र ठरलो आहोत. आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी मिळणे आवश्यक आहे. आयओसीच्या दबावाखाली ही घटनादुरुस्ती झाली आहे. भारतीय खेळाडूंना आपल्या देशाच्या ध्वजाखाली भाग घेता यावा यासाठीच आम्ही घटना दुरुस्तीस मान्यता दिली आहे. खेळाडूंचे नुकसान होऊ नये याच गोष्टीला आम्ही प्राधान्य दिले आहे.’’
ठळक निर्णय!
*गैरव्यवहाराचे आरोप असलेल्यांना आयओएमध्ये स्थान नाही.
*बंदी घातलेल्या आयओएचे अध्यक्ष अभयसिंह चौताला व सरचिटणीस ललित भानोत यांचे राजीनामे. निवडणूक लढविण्यास अपात्र.
*आयओएवरील बंदी रद्द करण्याचा मार्ग मोकळा.
*९ फेब्रुवारीला नव्याने निवडणुका.
आयओसीच्या दबावाखाली भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन नमले!
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन(आयओए)वर आता भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संघटकांना स्थान नाही. आंतरराष्ट्रीय
First published on: 09-12-2013 at 03:11 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian olympic association to hold elections on february 9 minus tainted officials