गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय ऑलिम्पिक संघटना (आयओए), आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघ (आयओसी) आणि क्रीडा मंत्रालयाचे पदाधिकारी यांच्यात होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली. आता भारतावरील ऑलिम्पिक बंदी उठवण्यासाठी तोडगा काढण्याकरिता भारतीय ऑलिम्पिक संघटनेला आयओसीकडून मार्गदर्शनाची प्रतीक्षा आहे.
स्वित्र्झलडमधील लुसाने येथे १५ आणि १६ एप्रिल रोजी होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे हंगामी अध्यक्ष विजय कुमार मल्होत्रा यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला पत्र लिहून क्रीडा मंत्रालयावर ताशेरे ओढले आहेत. ‘‘कळीचा मुद्दा असलेली क्रीडा आचारसंहिता नव्याने बनवण्यासाठी क्रीडा मंत्रालयाने समिती स्थापन केली आहे. या सर्वाचा या बैठकीवर नकारात्मक परिणाम होत आहे,’’ असे मल्होत्रा यांनी आयओसीचे अध्यक्ष जॅक रॉगे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.