भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) २०१९ मध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संयोजनपदासाठी उत्सुक असून त्यासाठी त्यांनी विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडून आपले मत मागितले आहे.
आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी या संदर्भात पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, या स्पर्धेसाठी संयोजनपदाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी केंद्रीय क्रीडा व युवक मंत्रालयाने याबाबत स्वारस्य दाखविले आहे. एक जुलैपर्यंत मुदत असल्यामुळे संघटनांनी त्वरित आपले मत पाठविणे अपेक्षित आहे. सर्व संघटनांची बैठक आयोजित करून त्यानंतर प्रस्ताव पाठविणे म्हणजे दीर्घ कालावधी लागणार असल्यामुळे त्याऐवजी सर्वाकडून त्वरित हे मत मागविण्यात आले आहे.
मेहता यांनी सर्व राज्यांच्या ऑलिम्पिक संघटनांनाही हे पत्र पाठविले आहे. व्हिएतनाम देशाकडे या स्पर्धेचे संयोजनपद होते मात्र त्यांनी हनोई येथे ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्याचे कळविले आहे. त्यामुळेच भारत या स्पर्धेसाठी उत्सुक आहे.
आयओएचे अध्यक्ष एन.रामचंद्रन यांनी तीन दिवसांपूर्वी क्रीडा मंत्री सरबनंदा सोनोवाल यांची भेट घेऊन या संयोजनपदाबाबत आयओएने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे सांगितले होते.

Story img Loader