भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीत अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेल्या रणधीर सिंग यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीला एक वेगळेच वळण मिळाले आहे. या नाटय़मय घडामोडीनंतर अभय सिंग चौटाला यांचा अध्यक्षपदासाठीचा मार्ग सुकर झाला आहे.
५ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीतून रणधीर सिंग यांनी माघार घेतल्यामुळे दोन्ही गटांमधील वाद आता संपुष्टात येईल, अशी अपेक्षा आहे. निवडणूक निर्णयाधिकारी निवृत्त न्यायाधीश व्ही. के. बाली यांच्यासमोर आपल्या माघारी अर्जावर रणधीर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. ते म्हणाले, ‘‘सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही निवडणूक झाली तर आम्ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेची मान्यता रद्द करू, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) खडसावून सांगितले आहे. तशा आशयाचे पत्र खुद्द आयओसीचे अध्यक्ष जॅक रॉगे आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष शेख अहमद अल फहाद अल साबाह यांनी पाठवले आहे. आयओसीचा सदस्य या नात्याने मी त्यांच्याविरोधात जाऊ शकत नाही. म्हणूनच मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.’’
रणधीर हे आयओसीचे महासचिव आहेत.रणधीर यांच्या या निर्णयाचे चौटाला यांनी स्वागत केले आहे. ‘‘रणधीर यांनी योग्य निर्णय घेतला असून त्यांना मी शुभेच्छा देतो. तुम्ही ही निवडणूक लढवू नका, असे मी त्यांना सुरुवातीपासूनच सांगत होतो,’’ असे चौटाला यांनी सांगितले. अध्यक्षपदासाठीचे आणखी एक उमेदवार राज चोप्रा यांनीही रविवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.    

Story img Loader