दिजू-ज्वालाची विजयी सुरुवात
इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धा
भारताचा ऑलिम्पिकपटू आणि पाचव्या मानांकित पी. कश्यपला इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतील पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. तौफिक हिदायत या इंडोनेशियाच्या खेळाडूने त्याच्यावर १३-२१, २३-२१, २१-१८ अशी मात केली. भारताच्या व्ही. दिजू-ज्वाला गट्टा, अजय जयराम, के. श्रीकांत यांनी मात्र विजयी सलामी नोंदवली.
ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल गाठणाऱ्या कश्यपचे चुरशीच्या लढतीनंतर आव्हान संपुष्टात आले. तौफिकला या स्पध्रेचे मानांकन देण्यात आलेले नसले तरी तो अनुभवी खेळाडू आहे. त्याने अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत हा सामना जिंकला. शेवटपर्यंत ही लढत रंगतदार झाली. एक तास चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला. निर्णायक क्षणी कश्यपने केलेली चूक तौफिकच्या पथ्यावर पडली. के. श्रीकांत या भारताच्या खेळाडूने चौथ्या मानांकित जान ओ जॉर्जेन्सन (डेन्मार्क) याचा पराभव करीत अनपेक्षित विजयाची नोंद केली. रंगतदार झालेला हा सामना श्रीकांतने २१-७, १८-२१, २१-१२ असा जिंकला. अजय जयरामने विजयी प्रारंभ करताना रशियाच्या व्लादिमीर माल्कोव्ह याचा २१-१७, २१-१७ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. बी. साईप्रणीत याने आव्हान राखताना जपानच्या केन्टो मोयोता याला २१-१७, २१-११ असे हरविले.
मिश्र दुहेरीत जागतिक कांस्यपदक विजेत्या दिजू व ज्वाला यांनी ख्रिस लँग्रिज व हीदर ऑलिव्हर या ब्रिटिश जोडीचा १९-२१, २१-१५, २१-१६ असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर भारतीय जोडीने परतीचे फटके व सव्‍‌र्हिसवर नियंत्रण ठेवीत विजयश्री संपादन केली. भारताच्याच प्रज्ञा गद्रे व अक्षय देवळकर यांनीही विजयी वाटचाल केली. त्यांनी अँड्रय़ू एलिस व कॅरेन स्मिथ यांचा २१-७, १८-२१, २१-१२ असा पराभव केला. अपर्णा बालन व अरुण विष्णू यांना पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडच्या ख्रिस अ‍ॅडकॉक व गॅब्रियल व्हाईट यांनी त्यांच्यावर २१-१५, २१-१६ अशी मात केली. महिलांच्या एकेरीत पुण्याच्या सायली गोखले हिला आव्हान टिकविण्यात अपयश आले. तिसऱ्या मानांकित राचनोक इन्तानोवा हिने तिला २१-८, २१-१२ असे सहज पराभूत केले.

Story img Loader