करो या मरो अशा स्थितीत असलेला इंग्लंडविरुद्धचा चौथा टी-20 सामना भारताने 8 धावांनी जिंकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने झंझावाती अर्धशतक करत संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली. परिणामी इंग्लंडला हे आव्हान पचवणे जड गेले. शेवटी त्यांना हार पत्करावी लागली. सूर्यकुमारने अर्धशतक करत सर्वांची वाहवा मिळवली.  त्याच्याशिवाय, आणखी एका मुंबईच्या क्रिकेटपटूने याच टी-20 सामन्यात खास कामगिरी नोंदवली. या फलंदाजाने सामन्यात फक्त 12 धावा केल्या, तरीही तो एका खास विक्रमाचा नायक ठरला.

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात एक खास विक्रम नोंदवला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत रोहित मोठी खेळी नोंदवणार असे वाटत होते. मात्र, आर्चरच्या गोलंदाजीवर तो झेल देऊन माघारी परतला. त्याने 12 धावा केल्या असल्या, तरी या धावांमुळे त्याने टी-20 क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. रोहितने 342 टी-२० सामन्यांत खेळताना 9000 धावा पूर्ण केल्या. यातील 2,800 धावा त्याने आंतराष्ट्रीय टी-20 सामन्यात केल्या आहेत.

 

विराटने याआधी पार केलाय हा टप्पा

अशी कामगिरी करणारा हिटमॅन भारताचा दुसरा, तर जगातील नववा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी विराटने ही कामगिरी केली आहे. विराटच्या नावे 302 सामन्यात 9,650 धावा आहेत.

 ख्रिस गेल अग्रस्थानी

वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज ख्रिस गेल या विक्रमात अग्रेसर आहे. टी-20 क्रिकेटमध्ये गेलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. गेलने 13,720 धावा केल्या आहेत. गेलनंतर विंडीजचा कायरन पोलार्ड दुसऱ्या स्थानी असून त्याने टी-20मध्ये 10,629 धावा केल्या आहेत. पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक 10,488 धावांसह तिसऱ्या स्थानी आहे.

चौथ्या टी-20 सामन्यात भारत विजयी

अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी -20 सामन्यात भारताने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 185 धावा केल्या. दडपणाखाली खेळणारा इंग्लंडचा संघ केवळ 177 धावा करू शकला. सूर्यकुमार यादवने 31 चेंडूत 57 धावा केल्या. शार्दुल ठाकूरने 3 आणि हार्दिक पंड्या आणि राहुल चहरने 2-2 गडी बाद केले.

Story img Loader