भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. २३ नोव्हेंबर रोजी नुपूर नागरशी भुवनेश्वर लग्न करणार असून २६ आणि २९ नोव्हेंबर रोजी बुलंदशहर आणि दिल्ली येथे शाही रिसेप्शन सोहळा रंगणार आहे.

भुवनेश्वर कुमारने ४ ऑक्टोबर रोजी नुपूर नागरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड करुन साखरपुडा झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. नुपूर ही बीटेक झाली असून ती दिल्लीतील एका कंपनीत कामाला आहे. आता भुवनेश्वर आणि नुपूर लग्न कधी करणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती.

‘इंडिया टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार भुवी आणि नुपूरच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. २३ नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये भुवनेश्वर आणि नुपूर विवाह बंधनात अडकतील. या सोहळ्याला मोजकीच मंडळी उपस्थित असतील. लग्नानंतर बुलंदशहर आणि दिल्लीत रिसेप्शन सोहळा पार पडेल. २९ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रिसेप्शनमध्ये महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, सुरेश रैनासह ‘टीम इंडिया’चे सर्व खेळाडू उपस्थित असतील, अशी चर्चा आहे.

उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे पदाधिकारीही या सोहळ्याला उपस्थित राहतील, असे समजते.
लग्नासाठी भुवनेश्वरने कोलकाता येथून शेरवानी मागवल्याचे समजते. भुवनेश्वरची होणारी पत्नी नुपूरचे वडील हे उत्तर प्रदेशमधील माजी पोलीस अधिकारी आहेत. भुवी आणि नुपूर यांचे कुटुंब आधीपासूनच एकमेकांना ओळखत असून मेरठमधील गंगानगर येथे दोन्ही कुटुंब राहतात.

Story img Loader