विंडीजविरुद्धची टी२० मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेत काही भारतीय गोलंदाजांची धुलाई झाली, तर काही गोलंदाज प्रभावी ठरली. त्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय गोलंदाज आपल्या पद्धतीने तयारी करू लागले आहेत. भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमीहा तर व्हिडीओ पाहून सराव करत असल्याचे त्याने सांगितले आहे.
इंग्लंड दौऱ्यावर वेगवान गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी तयारी करताना तेथे कशी गोलंदाजी करता येईल? याचे मी व्हिडीओ पाहत आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या शैलीचा अभ्यास व्हिडिओच्या माध्यमातून मी करत आहे. संपूर्ण मालिकेवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने मी असा सराव करत आहे. त्यामुळे अभ्यास करून खेळपट्टीवर योग्य दिशेने आणि वेगाने गोलंदाजी करण्यावर आमचा भर असेल, असे शमीने सांगितले.
आम्ही नेहमी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण विजय किंवा पराभव हा नशिबाचा भाग आहे. आम्ही आमचे १०० टक्के योगदान देण्याचे काम करतो, हे महत्वाचे आहे, असेही तो म्हणाला. वेस्ट इंडिजविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत शमीचा भारतीय संघात समावेश होता.तसेच इंग्लंड दौऱ्यावर शमीने आपल्या कामगिरीने सर्वाना प्रभावित केले होते. त्याप्रमाणेच या दौऱ्यावरही चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने तो कसून सराव करत आहे.