आय लीग, आयएसएल या स्पर्धाच्या तारखा योग्य प्रकारे निश्चित करता आल्यास आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या तयारीसाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होईल आणि भारताची कामगिरी उंचावेल,’’ असे मत भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने व्यक्त केले.
‘‘इंडियन सुपर लीग (आयएसएल) आणि प्रो कबड्डी या दोन्ही स्पर्धा आता जनमानसात चांगल्या रुजल्या आहेत. या खेळांना त्यांचे यथोचित स्थान मिळाले आहे. आता अन्य खेळांनीही त्यांचे अनुकरण करावे,’’ असा सल्ला सुनीलने यावेळी दिला. या लीगचा फायदा देशातील गुणवत्ता विकसित करण्यासाठी होतो, त्यामुळे या खेळांमध्ये आपली प्रगती दिसू शकेल, असे त्याने सांगितले.
‘‘मी प्रथमच प्रो कबड्डीला हजेरी लावली आणि त्याचा चाहता झालो आहे,’’ असे प्रो कबड्डी लीगच्या सामन्यांना हजेरी लावल्यानंतर भारावलेल्या सुनीलने सांगितले. ‘‘फुटबॉल आणि कबड्डी या दोन्ही खेळांमध्ये तंत्र, पदलालित्य आणि समयसूचकता जास्त महत्त्वाची असते. क्रीडारसिकांना आकर्षित करणाऱ्या या दोन्ही खेळांमध्ये ताकद आणि समन्वय यांची महत्त्वाची भूमिका असते,’’ असे सुनीलने सांगितले.
दबंग दिल्ली संघातील खेळाडूंशी सुनीलने भेट घेतली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवला. फुटबॉलप्रमाणेच कबड्डी हा सांघिक खेळ आहे. वैयक्तिक कामगिरीला प्राधान्य न देता सांघिक दृष्टीकोनातून खेळ केल्यास त्याचा फायदा संघाला होतो, असा कानमंत्र सुनीलने यावेळी दिल्लीच्या खेळाडूंना दिला. ‘‘मी खेळाडूंशी दहा मिनिटे बोललो आणि माझ्या क्रीडा कारकीर्दीतील अनुभवाच्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या. मलासुद्धा त्यांना भेटल्याचा अतिशय आनंद झाला,’’ असे सुनीलने सांगितले.
मुंबई सिटी एफसी संघाकडून यंदा आयएसएलच्या दुसऱ्या हंगामात खेळण्यासाठी सुनील अतिशय उत्सुक आहे. क्लबच्या करारामुळे पहिल्या हंगामात तो खेळू शकला नव्हता.

Story img Loader