आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चुकीच्या नियोजनामुळे भारतीय खेळाडूंना फारशी विश्रांती न घेता लागोपाठ दोन स्पर्धामध्ये भाग घ्यावा लागणार असून त्यामुळे खेळाडूंचे खूपच नुकसान होत आहे, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक विम कोएव्हरमन्स यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
आगामी आशियाई चषक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबीर येथील भारती विद्यापीठ क्रीडा संकुल (धनकवडी) येथे सुरू आहे. भारतीय संघास या स्पर्धेत चीन तैपेई (२ मार्च), गुआम (४ मार्च) व यजमान म्यानमार (६ मार्च) यांच्याशी खेळावे लागणार आहे. या स्पर्धेबरोबरच आशियाई स्तरावरील आंतरक्लब स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे चर्चिल ब्रदर्स व ईस्ट बंगाल हे दोन संघ सहभागी होत आहेत. भारतीय संघाचे सराव शिबिर २५ फेब्रुवारीपर्यंत येथे चालणार आहे. या शिबिराकरिता अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने तीस खेळाडूंची निवड केली आहे. त्यामधून २३ खेळाडूंची निवड आशियाई स्पर्धेकरिता केली जाणार आहे.  
सराव शिबीर सुरू असतानाच चर्चिल ब्रदर्सच्या चार खेळाडूंना आंतरक्लब स्पर्धेसाठी जावे लागले आहे. त्यांच्यापाठोपाठ २२ फेब्रुवारी रोजी शिबिरातील आणखी चार खेळाडू ईस्ट बंगालकडून खेळण्यासाठी शिबिर सोडून जाणार आहेत. खरं तर खेळाडूंनी शिबिर सोडून जाणे माझ्या शिस्तीत बसत नाही मात्र क्लब स्पर्धाही महत्त्वाची आहे. आशियाई फुटबॉल महासंघाने विविध स्पर्धाचे नियोजन करताना खेळाडूंना होणाऱ्या दुखापती, शारीरिक तंदुरुस्ती व विश्रांती या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आगामी दोन स्पर्धामध्ये खेळाडूंना फक्त दोन दिवसांचीच विश्रांती मिळणार आहे. एक दोन खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नसले तर त्यांच्याऐवजी पर्यायी खेळाडूंना व्हिसा मिळण्यात अडचणी येऊ शकतात याचाही विचार होण्याची गरज आहे, असे कोएव्हरमन्स म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा चांगले स्थान मिळविण्यासाठी नेमके काय केले पाहिजे या प्रश्नावर कोएव्हरमन्स म्हणाले, भारतात स्पर्धाची संख्या वाढली असली तरी त्याद्वारे अपेक्षेइतका अनुभव भारतीय खेळाडूंना मिळू शकत नाही. भारतीय खेळाडूंना अधिकाधिक परदेशी संघांबरोबर प्रदर्शनीय सामने खेळण्याची आवश्यकता आहे. विशेषत: युरोपियन देशांबरोबर सामने खेळले गेले तर त्यांच्यात अनुभव समृद्धता येऊ शकेल. भारतीय संघाकरिता येथे चांगल्या सुविधा असल्या तरी प्रत्येक ठिकाणी अशा सुविधा असतील असे सांगता येणार नाही. खेळाडूंसाठी अव्वल दर्जाचे मैदान, अद्ययावत व्यायामशाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अन्य प्रशिक्षण सुविधांची आवश्यकता आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा