सतत तालिबानी दहशतवादाच्या सावटाखाली व बॉम्बस्फोटाने हादरणाऱ्या अफगाणिस्तानच्या नागरिकांना आयपीएलने एक सुखद धक्का दिला आहे. कालपासून (शनिवार) आयपीएल २०१८ साठी खेळाडुंची बोली सुरू आहे. विशेष म्हणजे यंदाच्या बोलीत अफगाणिस्तानच्या खेळाडुंना अनपेक्षित मागणी दिसून आली. शनिवारी अफगाणिस्तानच्या रशीद खानसाठी हैदराबादने तब्बल ९ कोटी मोजले होते. सर्वोच्च बोली लागलेल्या पहिल्या काही खेळाडुंत रशीदचा समावेश होतो. पण आज १७ वर्षीय फिरकीपटू मुजीब झद्रान याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पंजाबने त्याच्यासाठी चक्क ४ कोटी रूपये मोजले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अफगाणिस्तानच्या खेळाडुंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवले आहे. आयपीएलमुळे अफगाणिस्तानच्या खेळाडुंना आपले कौशल्य दाखवण्याची एक नामी संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या लिलावात अफगाणिस्तानचे ११ खेळाडु सहभागी झाले आहेत. यामध्ये मुजीबसह चार खेळाडुंचा लिलाव झाला आहे.
17 year old Afghanistan spin bowler Mujeeb Zadran sold to Punjab for 4 crore #IPLAuction
— ANI (@ANI) January 28, 2018
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात झहीर खान पक्तीनला ६० लाखांचा भाव मिळाला. राजस्थान संघाकडून तो खेळणार आहे. अष्टपैलू मोहम्मद नबीसाठी सनरायजर्स हैदराबादने एक कोटींची बोली लावली. ऑफस्पिनर मुजीब अफगाणिस्तानकडून १९ वर्षांखालील संघातून खेळतो. यापूर्वी त्याची चांगली कामगिरी राहिली आहे. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानचा संघ प्रथमच अंडर १९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्याने न्यूझीलंडविरोधात खेळताना अवघ्या १४ धावा देत ४ बळी टिपले होते.
हे खेळाडुही लिलावात आहेत सहभागी: शफीक्लुल्ला शफीक, नजीबुल्लाह झद्रान, दौलत झद्रान, शापूर झद्रान, गुलाबदीन नईब. या खेळाडुंनाही आयपीएलच्या ११ व्या सत्रात संधी मिळण्याची अपेक्षा आहे. यंदाचे आयपीएल अफगाणिस्तानच्या खेळाडुंसाठी अत्यंत लाभदायी ठरले आहे. यामुळे अफगाणिस्तानमधील क्रिकेट वाढीला प्रोत्साहन मिळणार असून नेहमी दहशतीखाली असलेल्या नागरिकांना ही पर्वणीच ठरणार आहे.