जेद्दा (सौदी अरेबिया) : दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघातून बाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमारने आपल्या अनुभवाच्या जोरावर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) संघांना लिलावाच्या दुसऱ्या दिवशी आकर्षित करण्यात यश मिळवले. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने त्याला १० कोटी ७५ लाख रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. भुवनेश्वरसह भारतीय वेगवान गोलंदाजांसाठी मोठी मागणी पाहायला मिळाली.
गेल्या काही काळापासून दुखापतींचा सामना करत असलेल्या दीपक चहरला मुंबई इंडियन्सने नऊ कोटी २५ लाख रुपयांना आपल्या संघात घेतले. कसोटी संघातील राखीव खेळाडू मुकेश कुमारसाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने ‘आरटीएम’ कार्डचा वापर करत आठ कोटी रुपये खर्च केले. आकाश दीपला लखनऊ सुपर जायंट्सने आठ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले.
भुवनेश्वरने आतापर्यंत २८७ ट्वेन्टी-२० सामन्यांत ३०० बळी मिळवले. त्याने भारताकडून अखेरचा सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. मात्र, ‘आयपीएल’मध्ये त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात यश आले आहे. मुंबईकर वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेला राजस्थान रॉयल्सने तब्बल ६ कोटी ५० लाख रुपयांना संघात सहभागी करून घेतले. माजी संघ चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान यांच्यात तुषारसाठी बरीच चढाओढ पाहायला मिळाली. अखेर राजस्थानने बाजी मारली.
हेही वाचा >>>IPL Auction 2025: कोण आहे प्रियांश आर्य? ३० लाख मूळ किंमत असलेल्या खेळाडूसाठी लागली ३ कोटींची बोली
दुसऱ्या दिवसाचे महागडे खेळाडू
● भुवनेश्वर कुमार (१०.७५ कोटी) बंगळूरु
● दीपक चहर (९.२५ कोटी) मुंबई
● मुकेश कुमार (८ कोटी) दिल्ली
● आकाश दीप (८ कोटी) लखनऊ
● मार्को यान्सन (७ कोटी) पंजाब
● तुषार देशपांडे (६.५० कोटी) राजस्थान
● कृणाल पंड्या (५.७५ कोटी) बंगळूरु
● विल जॅक्स (५.२५ कोटी) मुंबई
● अल्लाह घझनफर (४.८० कोटी) मुंबई
● प्रियांश आर्या (३.८० कोटी) पंजाब
नामांकितांकडे पाठ
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो, भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, न्यूझीलंडचा केन विल्यम्सन, भारताचे सर्फराज खान, मयांक अगरवाल, पियूष चावला, मुंबईकर फिरकीपटू तनुुष कोटियन या खेळाडूंकडे संघ मालकांनी पाठ फिरवली.