पीटीआय, अहमदाबाद : गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर मिळवलेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सला ‘प्ले-ऑफ’मध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटची अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी मुंबईला आता त्याच गुजरात संघाचे आव्हान परतवावे लागेल. पाच वेळचे विजेते मुंबई आणि गतविजेते गुजरात या संघांमधील ‘क्वालिफायर-२’चा सामना आज, शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘क्वालिफायर-१’च्या सामन्यात गुजरातला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. मात्र, साखळी फेरीअंती गुणतालिकेत अग्रस्थानी राहिल्यामुळे गुजरातला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. दुसरीकडे, बुधवारी झालेल्या ‘एलिमिनेटर’च्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा ८१ धावांनी धुव्वा उडवल्यामुळे मुंबईचा संघ ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यासाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांना रोखण्यासाठी गुजरातला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

लखनऊवरील मुंबईच्या विजयात नवोदित वेगवान गोलंदाज आकाश मढवालने प्रमुख भूमिका बजावली. मढवालने पाच धावांतच पाच गडी बाद करत लखनऊच्या डावाला खिंडार पाडले. त्याने त्याआधीच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्धही चार बळी मिळवले होते. आता त्याच्यासमोर शुभमन गिलला रोखण्याचे आव्हान असेल.

रोहित, मढवालवर नजर

या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज आकाश मढवाल या मुंबईच्या खेळाडूंवर दोन भिन्न कारणांसाठी सर्वाची नजर असेल. रोहितला यंदा धावांसाठी झगडावे लागले आहे. त्यामुळे तो कामगिरी उंचावतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. तर दुसरीकडे गेल्या दोन सामन्यांत मिळून नऊ गडी बाद करणारा मढवाल कामगिरीत सातत्य राखतो का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. मुंबईच्या फलंदाजीची भिस्त कर्णधार रोहितसह इशान किशन, कॅमरुन ग्रीन आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर असेल. तसेच तिलक वर्माच्या पुनरागमनामुळे मुंबईची फलंदाजी अधिक मजबूत झाली असून त्याच्यासह टीम डेव्हिड आणि नेहाल वढेरा यांच्यावर अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी असेल. फिरकीची धुरा पीयूष चावला सांभाळेल.

हार्दिक कामगिरी उंचावणार?

मुंबईचा कर्णधार रोहितप्रमाणेच गुजरातचा कर्णधार हार्दिकलाही यंदाच्या हंगामात अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. हार्दिकने फलंदाजीत १४ सामन्यांत २९७ धावा केल्या असून यात केवळ दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच गोलंदाजीत त्याला केवळ तीन बळी मिळवता आले आहेत. त्यामुळे गुजरातला सलग दुसऱ्यांदा ‘आयपीएल’ची अंतिम फेरी गाठायची असल्यास हार्दिकने आपला माजी संघ मुंबईविरुद्ध कामगिरी उंचावणे गरजेचे आहे. गुजरातसाठी फलंदाजीत शुभमन गिल (१५ सामन्यांत ७२२ धावा), तर गोलंदाजीत मोहम्मद शमी (१५ सामन्यांत २६ बळी) आणि रशीद खान (१५ सामन्यांत २५ बळी) यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे.

  • वेळ : सायं. ७.३० वाजता
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, जिओ सिनेमा 
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league cricket goal of the final mumbai indian vs gujrat titans ysh