आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी संघातील खेळाडूंना कायम ठेवण्यासाठीची यादी शुक्रवारी सादर करायची असून गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ आपले पाच खेळाडू कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकावू न शकलेला दिल्ली डेअर डेव्हिल्सचा संघ नव्याने बांधणीसाठी सज्ज असल्याचे समजते.
या वर्षीही चेन्नईच्या संघातील कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि सुरेश रैना कायम ठेवण्याचा संघ व्यवस्थानाचा मानस आहे. तर संघातील ड्वेन ब्राव्हो आणि फॅफ डय़ू प्लेसिस यापैकी एक खेळाडू त्यांना कायम ठेवावा लागेल.
मुंबईचा संघ या वेळी पहिल्यांदाच मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरशिवाय उतरणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे संघ व्यवस्थापन पाच खेळाडू संघात कायम ठेवणार आहे. यामध्ये संघाला जेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्मा, वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड, हरभजन सिंग, मिचेल जॉन्सन आणि लसिथ मलिंगा यांचा प्रामुख्याने समावेश असेल. त्याचबरोबर दिनेश कार्तिक आणि अंबाती रायुडू यांना कायम ठेवण्यासाठीही संघ व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे समजते.
विजय मल्ल्या यांच्या संघामध्ये तडफदार सलामीवीर ख्रिस गेल आणि कर्णधार विराट कोहली तसेच एबी डीव्हिलियर्स या तीन खेळाडूंना संघात कायम राखले आहे. दिल्लीच्या संघाला आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे संघाचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग याला संघात कायम ठेवण्यात येणार नसल्याचे चिन्ह आहे.
कोलकाता नाइट रायडर्स संघामध्ये कर्णधार गौतम गंभीर आणि वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरीन यांना कायम ठेवले जाण्याची दाट शक्यता आहे. राहुल द्रविडने आयपीएलला अलविदा केल्याने शेन वॉटसन हा संघाचा कर्णधार असेल, तर अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन यांना संघात कायम ठेवण्यात येईल.
अॅडम गिलख्रिस्टने निवृत्ती घेतल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघातही बरेच बदल होण्याची शक्यता आहे; तर सनरायजर्स हैदराबादचा संघ सलामीवीर शिखर धवन, वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी यांना कायम ठेवणार आहे.
आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई पाच खेळाडू कायम ठेवणार
आयपीएलच्या सातव्या हंगामासाठी संघातील खेळाडूंना कायम ठेवण्यासाठीची यादी शुक्रवारी सादर करायची असून गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-01-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league mumbai indians and csk continue with five players