भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आलेले दोन अनुभवी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आर्थिक बाजारपेठेत सध्या तरी स्थान असल्याचे दिसत आहे. आयपीएलच्या सातव्या पर्वासाठी होणाऱ्या लिलावात दोन कोटी रुपयांच्या सर्वाधिक मूळ किंमत (बेस प्राइस) लाभलेल्या खेळाडूंमध्ये सेहवाग आणि युवराजसह ११ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
बंगळुरूला होणाऱ्या आयपीएलच्या लिलावामध्ये २३३ आंतरराष्ट्रीय खेळाडूंवर बोली लागणार असून, यापैकी भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या ४६ खेळाडूंचा समावेश आहे. देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंसाठी मूळ किंमत ५० लाख, एक कोटी, दीड कोटी आणि दोन कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.
न्यूझीलंडच्या कोरे अँडरसन मूळ किंमत एक कोटी रुपये आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक झळकावून अँडरसनने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आपल्या अष्टपैलू कामगिरीसह तो भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका गाजवत आहे. या पाश्र्वभूमीवर आयपीएलच्या लिलावात त्याला चांगला भाव मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने लिलावातून माघार घेतली आहे, तर अॅशेस मालिका गाजवणाऱ्या मायकेल क्लार्कची दोन कोटी रुपये मूळ किंमत ठरवण्यात आली आहे.
धावांसाठी आणि भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सध्या सेहवाग झगडत आहे, परंतु तरीही त्याला सर्वोच्च मूळ किमतीच्या टप्प्यात स्थान मिळाले आहे. याशिवाय अन्य दोन अनुभवी खेळाडू युवराज सिंग आणि आशीष नेहरासुद्धा लिलावात किमान दोन कोटी रुपये पदरात पडतील, अशी आशा राखून आहेत.
मुंबई इंडियन्स संघात पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता असलेल्या दिनेश कार्तिकचीसुद्धा मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे. कोलकाता नाइट रायडर्सचे मागील तीन हंगामांत प्रतिनिधित्व करणाऱ्या युसूफ पठाणचाही सर्वोच्च वर्गात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमार, लेग-स्पिनर अमित मिश्रा, डावखुरा फिरकी गोलंदाज प्रग्यान ओझा, कसोटीतील सलामीवीर मुरली विजय, बंगालचा मनोज तिवारी व कर्नाटकचा अनुभवी खेळाडू रॉबिन उथप्पा यांचा अव्वल मूळ किमतीच्या विभागात समावेश आहे.
अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान, कसोटी विशेषज्ञ चेतेश्वर पुजारा, हरहुन्नरी गोलंदाज भुवनेश्वर कुमार यांचा दीड कोटी रुपये मूळ किमतीच्या विभागात समावेश झाला आहे. तथापि, अशोक दिंडा, वृद्धिमान साहा, मोहित शर्मा यांना एक कोटी रुपये मूळ किंमत निश्चित करण्यात आली आहे. याचप्रमाणे दिल्लीच्या परविंदर अवानाची मूळ किंमत ५० लाख रुपये आहे. वेगवान गोलंदाज उमेश यादवची मूळ किंमत अद्याप निश्चित झालेली नसली, तरी इशांत शर्माची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे, तर झारखंडचा वेगवान गोलंदाज वरुण आरोनने लिलावामधून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाचा ४३ वर्षीय चायनामन गोलंदाज ब्रॅड हॉग हा या लिलावामधील सर्वात वयस्कर खेळाडू असूऩ, त्याची मूळ किंमत दीड कोटी रुपये आहे, तर ट्वेन्टी-२० विशेषज्ञ ब्रॅड हॉजची मूळ किंमत दोन कोटी रुपये निश्चित झाली आहे. माइक हसीसुद्धा दोन कोटी मूळ किमतीच्या विभागात आहे.
आयपीएलच्या लिलावासाठी वीरू, युवीला मानाचे स्थान
भारतीय क्रिकेट संघातून वगळण्यात आलेले दोन अनुभवी खेळाडू वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगला इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) आर्थिक बाजारपेठेत सध्या तरी स्थान असल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-01-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian premier league out of favour virender sehwag yuvraj singh in rs 2 crore price bracket