स्थानिक क्रिकेटमधील खराब कामगिरीचा परिणाम वीरेंद्र सेहवागच्या कारकिर्दीवर होण्याची चिन्हे आहेत. भारतीय संघाबाहेर फेकल्या गेलेल्या सेहवागला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पध्रेच्या सातव्या पर्वात याचा प्रभाव जाणवणार आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघ वीरेंद्र सेहवागला आपल्या संघात कायम ठेवण्याची शक्यता कमी दिसत आहे. या स्पध्रेत सहभागी होणाऱ्या आठ फ्रेंचायझींना १० जानेवारीपर्यंत आपल्या राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करयाची आहे.
 याशिवाय पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या क्रिकेटपटूंच्या लिलावामध्ये दक्षिण आफ्रिकेचा गुणवान डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉक आणि वेगवान शतक झळकावणारा न्यूझीलंडचा फलंदाज कोरी अँडरसन यांना चांगला भाव मिळण्याची चिन्हे आहेत.
सेहवाग आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या संघात महत्त्वाचा खेळाडू म्हणून स्थान भूषवत आहे. परंतु ‘नजफगढचा नवाब’ असे बिरूद मिरविणारा वीरू गेली काही वष्रे धावांसाठी झगडत आहे. मागील आयपीएल हंगामातील १३ डावांमध्ये सेहवागला १९.५०च्या सरासरीने २३४ धावा करता आल्या होत्या.
‘‘दिल्ली डेअरडेव्हिसचा संघ सेहवागऐवजी डेव्हिड वॉर्नरला संघात कायम ठेवण्याच्या बेतात आहे,’’ असे आयपीएलच्या सूत्रांकडून समजते. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची भूमिका यासंदर्भात महत्त्वाची ठरेल, असेही म्हटले जात आहे. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शतकांची हॅट्ट्रिक साजरी करणाऱ्या क्विंटन डी कॉकला आयपीएलच्या लिलावामध्ये चांगली भाव मिळू शकेल. फलंदाजीप्रमाणेच यष्टीरक्षणाची जबाबदारीही तो उत्तमरीत्या पेलतो. मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ डी कॉकला खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत.
याचप्रमाणे फक्त ३६ चेंडूंत शतक साजरे करणाऱ्या कोरे अँडरसनलाही मागणी आहे. गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील वेगवान शतक साकारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या रिचर्ड लेव्हीला मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. तशाच प्रकारे या वर्षी अँडरसनला भाव मिळू शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा