भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात बाजी मारली आहे. तिने चिनच्या वांग झी यीला पराभूत करत सिंगापूर ओपनच्या पदकावर आपलं नाव कोरलं आहे. पीव्ही सिंधूने रविवारी पार पडलेल्या सिंगापूर ओपन २०२२ मधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा २१-९, ११-२१, २१-१५ असा पराभव केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंगापूर ओपन २०२२ च्या अंतिम सामन्यात पी व्ही सिंधूनं अप्रतिम खेळी साकारली आहे. तिने पहिल्याच सेटमध्ये सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. पण दुसऱ्या सेटमध्ये चिनच्या वांग झी यीने कडवी झुंज दिली. परंतु अंतिम सेटमध्ये सिंधून चांगल्याप्रकारे पुनरागमन करत सिंगापूर ओपनवर आपलं नाव कोरलं आहे.

तत्पूर्वी, सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या सायना कावाकामीचा पराभव केला होता. सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ सेटमध्ये जिंकला. यावर्षी सिंधूने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० पदकं जिंकली आहेत. त्यानंतर सिंगापूर ओपनचं तिसरं पदकही तिने आपल्या नावावर केलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी व्ही सिंधूचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “पी व्ही सिंधूने भारतासाठी चांगली बातमी दिली आहे. तिने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. सिंगापूर ओपनचं पदक जिंकल्याबद्दल पी व्ही सिंधू तुझं खूप अभिनंदन. तू करोडो लोकांसाठी प्रेरणा आहेस.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian shuttler pv sindhu wins singapore open title defeat chinas wang zhi yi rmm