ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चोंग वेईवर मात; सायना उपांत्यपूर्व फेरीत
ऑलिम्पिक पदकप्राप्त आणि माजी अव्वल खेळाडू असलेल्या मलेशियाच्या ली चोंग वेईला नमवून भारताच्या बी. साई प्रणीतने क्रीडाक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेतील हा विजय प्रणीतच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा विजय आहे. अन्य लढतीत सायना नेहवालने उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
प्रणीतने ५० मिनिटांच्या संघर्षपूर्ण लढतीत अप्रतिम खेळ करताना तीन वेळा स्पध्रेचे जेतेपद पटकावणाऱ्या ली चोंग वेईवर २४-२२, २२-२० अशी मात केली. या लढतीपूर्वी चार वेळा समोरासमोर आलेल्या या खेळाडूंमध्ये वेईने निर्भेळ वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे याही सामन्यात त्याचा विजय निश्चित मानला जात होता, परंतु प्रणीतने सर्वाचे अंदाज चुकवले. सायनाने दुखापतीतून दमदार पुनरागमन करताना बुसानन ओंगबुमरुनफानला २१-१६, २१-९ असे नमवत उपांत्यपूर्व फेरी गाठली. थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासेत्र्सुकने १८-२१, २१-१७, २१-१२ अशा फरकाने सिंधूचे आव्हान संपुष्टात आणले. तिआन हौऊवेईने समीर वर्माचा १०-२१, २१-१२, २१-१९ असा पराभव केला.
हा माझ्यासाठी सर्वात मोठा सुखद धक्का आहे. अशा मोठय़ा विजयाच्या मी प्रतीक्षेत होतो. पहिल्या गेममध्ये १५-१५ अशी बरोबरी मिळवल्यानंतर माझ्यातला आत्मविश्वास वाढला आणि सातत्यपूर्ण खेळ करण्यावर मी भर दिला.
– बी.साईप्रणीत, बॅडिमंटनपटू