जून महिना हा भारतीय क्रिकेटसाठी फारच खास आहे. या महिन्यात अनेक दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले आहे. २० जून १९९६ रोजी माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर २०११मध्ये याच दिवशी माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी पदार्पण केले होते. या तीन माजी कर्णधारांशिवाय आणखी एका खेळाडूने जून महिन्यातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. भारतीय संघाचा विद्यामान कर्णधार रोहित शर्माने २३ जून २००७ रोजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या घटनेला आज १५वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त रोहितने आपल्या चाहत्यांसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

आजपासून १५वर्षांपूर्वी रोहित शर्माने आयर्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. १५वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त रोहितने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

रोहितने ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, “भारताकडून पदार्पण केल्यापासून आज मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५वर्षे पूर्ण करत आहे. हा नक्कीच एक असा प्रवास आहे जो मी आयुष्यभर जपेल. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो. मी आज ज्या ठिकाणी आहे तिथे पोहचण्यासाठी ज्यांनी मला मदत केली त्यांचे विशेष आभार. सर्व क्रिकेट प्रेमी, चाहते आणि समीक्षकांचेही आभार. संघासाठी तुमच्या मनात असलेले प्रेम आणि समर्थन हेच ​​आम्हाला सर्व अडचणींवर मात करण्यास मदत करते.”

हेही वाचा – ‘या’ व्यक्तीमुळे बिघडला विराटचा फॉर्म, माजी पाकिस्तानी कर्णधाराचे गंभीर आरोप

पदार्पण केल्यापासून रोहित शर्माने भारतीय संघासाठी अनेक महत्त्वपूर्ण सामने खेळले आहेत. कधीकधी तर एकट्याच्या बळावर त्याने संघाला विजय मिळवून दिले आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत ४५ कसोटी, २३० एकदिवसीय आणि १२५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये नऊ हजार २८३, कसोटी सामन्यांमध्ये तीन हजार १३७ आणि टी-२० सामन्यांमध्ये तीन हजार ३१३ धावा केलेल्या आहेत.

या वर्षाच्या सुरुवातीला विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्मा सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना होणार आहे. ही मालिका जर भारताने जिंकली तर, कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये दुसरी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम रोहितच्या नावे नोंदवला जाईल.

Story img Loader