गेल्या वर्षी करोनामुळे अर्धवट सोडलेली कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. १ जुलै ते ५ जुलै या काळात भारत आणि इंग्लंडदरम्यान एक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यापूर्वी २४ जूनपासून भारतीय संघ लिसेस्टरशायर येथे चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मात्र, त्यापूर्वीच भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. इंग्लंडमध्ये गेलेल्या कसोटी संघात रविचंद्रन अश्विन नजरेस पडला नाही. रविचंद्रन अश्विनला करोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी बहुतेक खेळाडू इंग्लंडमध्ये पोहोचले असून त्यांचा जोरदार सराव सुरू आहे. पण, कोविड-१९मुळे अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन अजूनही भारतातच आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने पीटीआयला याबाबत माहिती दिली. सध्या अश्विन क्वारंटाईनमध्ये आहे. त्याचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच तो इंग्लंडला जाऊ शकेल.
हेही वाचा – कार्तिकमुळे अधिक पर्यायांची उपलब्धता – राहुल द्रविड
सूत्राने असेही सांगितले की, करोनाची लागण झाल्यामुळे अश्विन लीसेस्टरशायरविरुद्धच्या सराव सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. अश्विन व्यतिरिक्त उर्वरित संघ लंडनला पोहोचला आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावाचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माकडे नेतृत्वाची जबाबदारी आलेली आहे. परदेशी भूमीवर प्रथमच कर्णधारपद भूषवणाऱ्या रोहित शर्माला केएल राहुलची उणीव भासेल. या जोडीने भारताला या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. यापूर्वी झालेल्या चार कसोटी सामन्यांमध्ये रोहितने एक शतक आणि दोन अर्धशतकांसह ३६८ धावा केल्या होत्या, तर राहुलने एक शतक आणि अर्धशतकासह ३१५ धावा केल्या होत्या.
केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शर्मा आणि गिल इंग्लंडविरुद्ध सलामी करताना दिसतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यापूर्वी संघाला रविचंद्रन अश्विनच्या आगमनाची प्रतिक्षा असणार आहे.