विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आज भारतीय संघनिवड

हैदराबाद : महेंद्रसिंग धोनीचा खराब फॉर्म आणि दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीच्या निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड गुरुवारी केली जाणार असून महेंद्रसिंग धोनीच्या जागी आक्रमक खेळाडू रिषभ पंतला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला २१ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र तीन वनडे सामन्यांसाठी की संपूर्ण मालिकेसाठी भारतीय संघ निवडला जाईल, हे अद्याप समजू शकलेले नाही. कर्णधार विराट कोहलीच्या उपस्थितीबाबत निवड समिती पेचात असून त्याला संपूर्ण मालिकेसाठी विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. धोनीची यष्टीरक्षणातील कामगिरी अप्रतिम होत असली तरी त्याची फलंदाजीतील कामगिरी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे त्याच्या निवडीविषयी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला योग्य निर्णय घ्यावा लागणार आहे.

‘‘धोनी पुढील विश्वचषकापर्यंत खेळणार आहे, हे सर्वानाच माहीत आहे. पण रिषभ पंत सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर जबरदस्त फलंदाजी करीत आहे. सामना एकहातीजिंकून देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्यामुळे त्याच्यावर अन्याय का करायचा,’’ असा सवाल बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने उपस्थित केला.

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत केदार जाधवच्या मांडीच्या स्नायूंची दुखापत पुन्हा एकदा उफाळून आली. त्यामुळे त्याने संपूर्ण मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्या जागी अंबाती रायडूला संधी मिळणार आहे. विश्रांतीनंतर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा हे संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.