आयपीएलमध्ये काही क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपांचा डाग लागलेला असतानाच भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुधवारी सकाळी लंडनला रवाना झाला. दुबईमार्गे भारतीय संघ लंडनला पोहोचणार आहे.
एकूण १५ क्रिकेटपटूंचा संघ कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्त्वाखाली लंडनला रवाना झाला. सहा जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामन्यांना सुरुवात होणार आहे. दौऱयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये धोनीने स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या कोणत्याही प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले. केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीशीसंबंधित प्रश्नांचीच उत्तरे त्याने दिली.
एक आणि चार जूनला भारतीय संघाचे सराव सामने होणार आहेत. भारतीय संघामध्ये महेंद्रसिंह धोनीसह शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मुरली विजय, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, इरफान पठाण, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, अमित मिश्रा आणि आर. विनय कुमार यांचा समावेश आहे.