टी २० वर्ल्डकपमधील भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर आता न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडचा भारत दौरा सुरू होणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी २० सामन्यात रोहित शर्माकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर टी २० संघात काही बदलही पाहायला मिळणार आहेत. हार्दिक पंड्याला संघाबाहेर करण्याची शक्यता आहे. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्याची शक्यता आहे. हर्षल पटेल, वरुण चक्रवर्ती यांना संघात स्थान मिळेल, असं सांगण्यात येत आहे. हर्षल पटेलने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तर श्रेयस अय्यरचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दीपक चाहर आणि राहुल चाहर यांना संधी मिळेल, असंही सांगण्यात येत आहे.

न्यूझीलंड विरुद्ध ३ टी २० सामन्यांची मालिका भारतीय संघ खेळणार आहे. विराट कोहली टी २० वर्ल्डकपनंतर भारतीय टी २० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे आता कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याबाबत खलबतं सुरु आहे. त्यात रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी रोहित शर्माच्या नावाचे यापूर्वीच संकेत दिले आहेत. आता बीसीसीआयच्या घोषणेनंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्याचबरोबर पहिल्या कसोटी सामन्याचं कर्णधारपद रोहित शर्माकडे असेल असंही सांगण्यात येत आहे. तर अजिंक्य रहाणेकडे उपकर्णधारपद असेल. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीला आराम देण्यात येणार असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात दिली आहे.

IPL 2022: आरसीबी संघाला मिळाला नवा हेड कोच; ट्वीट करत केली घोषणा

न्यूझीलंड टी २० वर्ल्डकप संपल्यानंतर तेट भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे या मालिकेसाठी कमी अवधी उरला आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे टी २० सामने असतील. तर कसोटी सामने कानपूर आणि मुंबई होणार आहेत. करोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. करोनामुळे आयपीएल आणि वर्ल्डकपचं आयोजनही युएईत करावं लागलं होतं.

Story img Loader