Team India For Asia Cup 2023: अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीची सोमवारी (२१ ऑगस्ट) दिल्लीत बैठक होणार आहे. भारतीय संघाने आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेसाठी आपल्या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतीच्या चिंतेने अद्याप संघ जाहीर केलेला नाही. पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेश या देशांनी आधीच आपले संघ जाहीर केले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने विश्वचषकासाठी तात्पुरते संघ जाहीर केले आहेत.
कर्णधार रोहित शर्माला बीसीसीआयने बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. त्यामुळे तो आणि कदाचित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. संघनिवडीला उशीर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे खेळाडूंची अनुउपलब्धता. टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. त्यातील काही खेळाडू हळूहळू संघात पुनरागमन करत आहेत. भारत १५ खेळाडू निवडतो की, आणखी काही राखीव खेळाडूंना संधी देतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
लोकेश राहुल संघात परत येऊ शकतो
भारताचे तीन प्रमुख खेळाडू जसप्रीत बुमराह, के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांना दुखापतीमुळे ते खेळापासून दूर राहिले. राहुलने नुकतीच फलंदाजी करायला सुरुवात केली असून तो पुनरागमनासाठी तयार आहे. आता त्याची संघात निवड होते की नाही हे पाहावे लागेल. श्रेयस अय्यरच्या फिटनेसवर अजूनही शंका आहे. अय्यरने फलंदाजीचा सरावही घेतला आहे, मात्र तो पूर्णपणे तंदुरुस्त मानला जात नाही.
बुमराहने आयर्लंड दौऱ्यावर शानदार पुनरागमन केले
बुमराहने आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन केले. या मालिकेत तो संघाचे नेतृत्व करत आहे. पहिल्या टी२० मध्ये बुमराहने शानदार गोलंदाजी करत दोन विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. बुमराहने त्याच्या फिटनेसचा जणू काही हा पुरावाच दिला आहे.
निवड समिती ‘या’ खेळाडूंवर पैज लावू शकते…
आशिया कप संघात के.एल. राहुलची निवड जवळपास निश्चित आहे, पण श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे का? श्रेयस अय्यरच्या फिटनेसचा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे, श्रेयस अय्यर नसेल, तर कोणत्या खेळाडूला संधी मिळेल… खरे तर श्रेयस अय्यर नसेल तर सूर्यकुमार यादव खेळणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे. याशिवाय वेस्ट इंडिज मालिकेत पदार्पण करणारा युवा फलंदाज तिलक वर्मा याला देखील आजमावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत तिलक वर्माने शानदार फलंदाजीचा दर्शन घडवले होते.
भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी
BCCI सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी १९ जुलै रोजी आशिया कप २०२३चे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पाकिस्तानमध्ये चार आणि श्रीलंकेत नऊ सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. भारत अ गटात आहे. पाकिस्तान आणि नेपाळही त्याच्यासोबत आहेत. तर ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान आहेत. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-४ फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.