सचिन तेंडुलकरच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट शनिवारी एका शानदार विजयानिशी झाला. वानखेडे स्टेडियमवर भारताने एक डाव आणि १२६ धावांनी तिसऱ्या दिवशीच विजय साजरा करून क्रिकेटमधील या महान राजदूताला त्याच्या लौकिकाला साजेसा असाच निरोप देण्यात आला. दुबळ्या वेस्ट इंडिज संघाने ईडन गार्डन्स कसोटीप्रमाणेच वानखेडेवरही भारतीय संघासमोर अक्षरश: गुडघे टेकले. त्यामुळे भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका रुबाबात २-० अशी खिशात घातली. या विजयामुळे भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत एका स्थानाने आगेकूच करीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
तिसऱ्या दिवशी क्रिकेटरसिक सचिनला अलविदा करण्यासाठी स्टेडियमवर आले होते. त्यामुळे भारतासाठी फक्त विजयाचे सोपस्कार करायचे होते. प्रग्यान ओझा आणि आर. अश्विन यांच्या फिरकीपुढे विंडीजच्या फलंदाजांचे दुसऱ्या डावातही काहीच चालले नाही. ख्रिस गेल (३५), शिवनारायण चंदरपॉल (४१) आणि दिनेश रामदिन (नाबाद ५३) वगळता एकाही वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने खेळपट्टीवर तग धरला नाही. उपाहाराला काही मिनिटे असताना मोहम्मद शामीने शेनॉन गॅब्रिएलची मधली यष्टी भेदली आणि भारताने विजयाच्या जल्लोषाला प्रारंभ केला. ओझाने ४९ धावांत ५ बळी घेतले, तर अश्विनने ८९ धावांत ४ बळी घेतले. सामन्यात दहा बळी घेणाऱ्या ओझाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले, तर पदार्पणाच्या मालिकेतील दोन्ही कसोटी सामन्यांत झुंजार शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
धावफलक
वेस्ट इंडिज (पहिला डाव) : १८२
भारत (पहिला डाव) : ४९५
वेस्ट इंडिज (दुसरा डाव) : ख्रिस गेल झे. धोनी गो. ओझा ३५, किरान पॉवेल झे. शामी गो. अश्विन ९, टिनो बेस्ट पायचीत गो. ओझा ९, डॅरेन ब्राव्हो झे. विजय गो. अश्विन ११, मार्लन सॅम्युअल्स यष्टिचीत धोनी गो. ओझा ११, शिवनारायण चंदरपॉल पायचीत गो. अश्विन ४१, नरसिंग देवनरिन झे. आणि गो. ओझा ०, दिनेश रामदिन नाबाद ५३, डॅरेन सॅमी पायचीत गो. ओझा १, शेन शिलिंगफोर्ड पायचीत गो. अश्विन ८, शेनॉन गॅब्रिएल त्रिफळा गो. शामी ०, अवांतर (बाइज ४, लेगबाइज ५) ९, एकूण ४७ षटकांत सर्व बाद १८७.
बाद क्रम : १-१५, २-२८, ३-४३, ४-७४, ५-८७, ६-८९, ७-१५७, ८-१६२, ९-१८५, १०-१८७.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ३-०-४-०, मोहम्मद शामी ७-०-२८-१, आर. अश्विन १७-४-८९-४, प्रग्यान ओझा १८-६-४९-५, सचिन तेंडुलकर २-०-८-०.
सामनावीर : प्रग्यान ओझा
मालिकावीर : रोहित शर्मा
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा