भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आतापर्यंत पाकिस्तानने २-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. अतिक्रिकेटमुळे यजमान भारतीय संघ वैतागला असल्याचे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार झहीर अब्बास यांनी व्यक्त केले.
‘‘भारताविरुद्ध इतक्या सहज विजयाची अपेक्षा नव्हती. निराशेच्या छायेत असलेला भारतीय संघ आणि नव्या दमाने, ऊर्जेने खेळणारा पाकिस्तान अशी ही लढत झाली. पाकिस्तानने चांगली कामगिरी केली असली तरी भारतीय संघातील खेळाडू दमलेले वाटत होते. अलीकडच्या काळात अतिक्रिकेट खेळल्यामुळेच भारताला आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करता आली नाही,’’ असेही झहीर अब्बास यांनी सांगितले.
मिसबाह उल हकच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने केलेल्या सांघिक कामगिरीची अब्बास यांनी स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘नासिर जमशेद, मोहम्मद हाफीझ यांनी फलंदाजीत तर उमर गुल, जुनैद खान आणि सईद अजमल यांनी गोलंदाजीत आपली छाप पाडली. अचूक टप्पा आणि दिशा राखून गोलंदाजी करत भारतीय फलंदाजांना रोखण्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी यश मिळवले. मायदेशात चाहत्यांसमोर खेळण्याचे अतिरिक्त दडपण भारतीय संघावर होते. पाकिस्तान संघ ही मालिका ३-० अशी जिंकेल, अशी आशा आहे.’’
दरम्यान, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाला संघबांधणी करण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे, असे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार इन्तिखाब आलम यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘तीन-चार अव्वल खेळाडू गमावल्यानंतर संघबांधणीसाठी वेळ हा लागणारच. जादूची कांडी फिरवावी आणि पुन्हा पूर्वीसारखे व्हावे, असे होणार नाही. चांगले खेळाडू घडवण्यासाठी किमान १० वर्षांचा काळ भारताला लागणार आहे. निवड समिती सदस्यांनी संयम बाळगून या महान खेळाडूंची जागा भरून काढण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन अवलंबण्याची गरज आहे. भारतीय संघ लवकरच पुन्हा जोमाने मुसंडी मारेल, अशी आशा आहे.’’
पाकिस्तानचा सलमीवीर नासिर जमशेदची स्तुती करताना आलम यांनी सांगितले की, ‘‘जमशेदमध्ये अफाट गुणवत्ता आहे. त्याने स्वत:ला दुखापतीपासून दूर राहण्याकडे लक्ष द्यावे. मात्र त्याने केलेल्या कामगिरीमुळे मी प्रभावित झालो आहे. त्याने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.२’’

Story img Loader