सचिन तेंडुलकरने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. अपयशी कामगिरीमुळे वीरेंद्र सेहवागला वगळण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणातील कसोटी सामन्यात धडाकेबाज खेळी साकारणाऱ्या शिखर धवनला संधी मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. गौतम गंभीरच्या साथीने धवन अशी भारताची सलामीची जोडी असण्याची शक्यता आहे.
आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची निवड करण्यासाठी शनिवारी राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार असून, इंग्लंडमध्ये होणाऱ्या या स्पध्रेकरिता समतोल फिरकी माऱ्यासोबत नवी सलामीची जोडी शोधणे हे त्यांच्यापुढील प्रमुख आव्हान असेल.
संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय निवड समितीने ६ एप्रिल रोजी ३० जणांचा संभाव्य संघ जाहीर केला. यात सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि ऑफ-स्पिनर हरभजन सिंग यांना डच्चू देण्यात आला होता. पण आयसीसीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य संघाव्यतिरिक्त खेळाडूंची अंतिम संघात निवड करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएल क्रिकेट स्पध्रेतील या खेळाडूंच्या कामगिरीची निवड समिती सदस्य बारकाईने पाहणी करीत आहे. परंतु आतापर्यंत तरी या खेळाडूंनी फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही.
संभाव्य खेळाडूंमध्ये गौतम गंभीर, मुरली विजय आणि शिखर धवन या विशेषज्ञ सलामीवीरांचा समावेश आहे. त्यामुळे सेहवागचा समावेश झाल्यास ते अत्यंत आश्चर्यकारक ठरेल. धवनची आयपीएलमधील आकडेवारीसुद्धा लक्षवेधक आहे.
फिरकी गोलंदाज म्हणून आर.अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, जलाल सक्सेना आणि परवेझ रस्सूल या पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय ७ मधल्या फळीतील फलंदाज, महेंद्रसिंग धोनीसहित ४ यष्टीरक्षक आणि १० मध्यमगती गोलंदाजांचा संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश आहे.
६ ते २३ जून दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील ‘ब’ गटाचा सलामीचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कार्डिफ, वेल्स येथे ६ जून रोजी होईल. भारताचा दुसरा सामना ११ जूनला वेस्ट इंडिजविरुद्ध केनिंग्टन येथे तर अखेरचा साखळी सामना १५ जून रोजी एजबॅस्टन येथे पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ ‘अ’ गटात आहेत. प्रत्येक गटातील दोन अव्वल संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने १९ आणि २० जून रोजी केनिंग्टन ओव्हल येथे होतील. अंतिम लढत २३ जून रोजी एजबॅस्टनला होईल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात २४ मार्चला संपलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघासमोर हे पहिलेच आंतरराष्ट्रीय आव्हान असेल.

भारताचा संभाव्य संघ
सलामीवीर : मुरली विजय, शिखर धवन, गौतम गंभीर, उन्मुक्त चंद,
मधली फळी : विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना, रोहित शर्मा, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू.
यष्टीरक्षक : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), वृद्धिमान साहा, दिनेश कार्तिक, केदार जाधव.
फिरकी गोलंदाज : आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जडेजा, जलाज सक्सेना, परवेझ रस्सूल.
मध्यमगती गोलंदाज : इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा, उमेश यादव, मोहम्मद शमी, इरफान पठाण, विनय कुमार, प्रवीण कुमार, ईश्वर पांडे आणि सिद्धार्थ कौल.

Story img Loader