५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी काल बीसीसीआयने भारताच्या वन-डे संघाची घोषणा केली. अपेक्षेप्रमाणे श्रीलंकेविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेतील खेळाडूंना बीसीसीआयच्या निवड समितीने पसंती दिली आहे. बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेल्या काही दिवसांमध्ये युवराज सिंह आणि सुरेश रैना यांनी यो-यो फिटनेस टेस्ट पास करत आपण संघात पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. मात्र स्थानिक सामन्यांमध्ये दोनही खेळाडूंना धावा काढण्यात अपयश आल्याने निवड समितीने युवराज आणि रैनाच्या नावांचा वन-डे संघासाठी विचार केला नसल्याचं कळतंय.

अवश्य वाचा – आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या वन-डे संघाची घोषणा, युवराज-रैनाला संघात जागा नाहीच

यंदाच्या रणजी हंगामात युवराज सिंह पंजाबकडून अवघा एक रणजी सामना खेळला. रणजी सामन्यात चांगला खेळ करुन आपलं स्थान भक्कम करण्याऐवजी युवराजने यो-यो टेस्ट पास करण्याकडे आपला भर दिला. याच कारणासाठी बीसीसीआयमधील काही अधिकारी व माजी खेळाडू युवराजवर नाराजही असल्याच्या बातम्या आल्या होत्या. दुसरीकडे सुरेश रैनालाही स्थानिक सामन्यांमध्ये फारशी चमकदार कामगिरी दाखवता आलेली नाहीये.

“फिटनेसच्या दृष्टीने युवराज सिंहने मेहनत घेऊन यो-यो टेस्ट उत्तीर्ण केली याचा मला आनंद आहे. मात्र स्थानिक सामन्यात यंदा युवराज फारसे सामने खेळलेला नाहीये. येत्या काही दिवसांत युवराजने स्थानिक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवली, तर त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे अद्यापही खुले आहेत.” आफ्रिकेविरुद्ध वन-डे संघ घोषित केल्यानंतर प्रसाद पत्रकारांशी बोलत होते.

सध्या सुरु असलेल्या श्रीलंकेविरुद्ध मालिकेत श्रेयस अय्यर, मनिष पांडे यांनी आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. केदार जाधव दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्धची मालिका खेळू शकला नसला, तरीही मधल्या फळीत त्याची आक्रमक फलंदाजी आणि कामचलाऊ फिरकी गोलंदाजी या जोरावर केदारचं संघातलं स्थान निश्चीत मानलं जातंय. त्यामुळे येत्या काही काळात युवराज आणि सुरेश रैनाला संघात जागा मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार असल्याचं दिसतंय.

Story img Loader