भारतीय क्रिकेट मंडळातील निवड समितीच्या अध्यक्षपदासाठीची शर्यत आता अधिकच रंजक बनत चालली आहे. बीसीसीआयने हकालपट्टी केलेल्या जुन्या समितीचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी पुन्हा या पदासाठी अर्ज केला आहे. त्याच्याशिवाय हरविंदर सिंगनेही पुन्हा निवडकर्ता होण्यासाठी अर्ज केला आहे. हरविंदर हे यापूर्वीच्या समितीचे सदस्य होते. ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ निवड समिती बरखास्त करण्यात आली होती.
दिवसेंदिवस बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख आणि इतर पदांसाठीची शर्यत खूपच मनोरंजक बनत चालली आहे. याचे कारण म्हणजे मागील समितीचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी पुन्हा एकदा त्याच पदासाठी अर्ज केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात ही माहिती दिली आहे. या वृत्तानुसार हरविंदर सिंगनेही पुन्हा एकदा निवडकर्ता पदासाठी अर्ज केला आहे. हरविंदर हे यापूर्वीच्या समितीतील सदस्य होते. बीसीसीआयने या समितीच्या सर्व सदस्यांचा कार्यकाळ वाढवला नाही. अहवालात म्हटले आहे की, आतापर्यंत चेतन शर्मा आणि हरविंदर यांच्यासह ६० हून अधिक अर्ज बीसीसीआयकडे आले आहेत.
मुंबईच्या वरिष्ठ संघ निवड समितीचे विद्यमान प्रमुख सलील अंकोला, माजी यष्टिरक्षक समीर दिघे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बालपणीचा मित्र आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी मुंबईतून अर्ज केला आहे. नव्या निवड समितीसाठी सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. ५० हून अधिक लोकांनी अर्ज केल्याचे समजते. विनोद कांबळी टीम इंडियाचा सिलेक्टर बनण्यास उत्सुक आहे.
टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. त्या पराभवाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा जागतिक स्पर्धेतील प्रवास संपला. त्यानंतरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कठोर कारवाई करत वरिष्ठ निवड समिती बरखास्त केली. आता पुन्हा या समितीची पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे माजी निवड समितीच्या अध्यक्षांनी पुन्हा एकदा निवड समितीचे प्रमुख होण्यासाठी अर्ज केल्याने चर्चेला उधाण आले.
आगरकर आणि मोंगियाही शर्यतीत
अजित आगरकर आणि नयन मोंगिया हे दिग्गज क्रिकेटपटूही निवड समितीच्या निवडणूक शर्यतीत सामील आहेत. त्यांच्याशिवाय लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनीही या विशेष समितीसाठी अर्ज केले आहेत. सुनील जोशी आणि देबाशिष मोहंती हेही आधीच्या समितीत होते, त्यांनी पुन्हा अर्ज केला नाही. समितीमध्ये निवडून येणाऱ्या पाच सदस्यांपैकी जो अनुभवाच्या दृष्टीने ज्येष्ठ असेल तो आपोआप मुख्य निवडकर्ता होईल.
निवड समितीचा प्रमुख पदासाठी आवश्यक पात्रता
७ किंवा अधिक कसोटी सामने खेळलेला कोणताही खेळाडू.
३० प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावेत.
१० एकदिवसीय सामने किंवा २० लिस्ट-ए सामने खेळलेले असावेत.
५ वर्षापूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती.
बीसीसीआयच्या कोणत्याही समितीचा सदस्य नसावा आणि पुढील ५ वर्षे सेवा करू शकेल.