आम्ही मालिका जिंकण्याच्या उद्देशाने खेळत आहोत. मात्र अजूनही मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. दरबानची खेळपट्टी भारतीय खेळाडूंना अनुकूल आहे आणि त्यामुळे ते पुनरागमन करू शकतात. त्यामुळे पहिल्या लढतीतील विजयाने हुरळून न जाता दुसऱ्या सामन्यात चांगले प्रदर्शन करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. भारतीय संघाची गोलंदाजी अजिबात वाईट नाही. मात्र त्यांच्या गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकांत आखूड टप्प्याचे चेंडू टाकले. त्यामुळे आम्हाला खेळणे सोपे झाले आणि आत्मविश्वास मिळाला. पहिल्या दहा षटकांत विकेट न गमावणे वाँडर्सच्या खेळपट्टीवर खूपच उपयुक्त आहे. पुढच्या ४० षटकांसाठी ही अतिशय चांगली पायाभरणी होते. भारतासारख्या मातब्बर संघाविरुद्ध विकेट हाताशी असणे सोयीचे ठरते. मोठय़ा संघाविरुद्धच्या मालिकेत सुरुवात चांगली होणे गरजेचे असते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेने नवीन असूनही क्विंटनने शानदार खेळ केला. हशीम सातत्यपूर्ण खेळासाठी ओळखला जातो. डेल स्टेन संघात असणे कोणत्याही कर्णधारासाठी आधार देणारे असते. तो अन्य गोलंदाजांनाही मार्गदर्शन करतो.

Story img Loader