खेळाडूंनी बहिष्काराचे अस्त्र उगारले तरी दडपणाखाली आम्ही कोणत्याही खेळाडूला पाठीशी घालणार नाही, अशी भूमिका घेत भारतीय टेनिस संघटनेने (एआयटीए) आपल्या सपोर्ट स्टाफचे समर्थन केले आहे. काही खेळाडूंच्या दबावामुळे आम्ही डेव्हिस चषकाचे कर्णधार आणि प्रशिक्षक यांना बदलण्यास तयार नाहीत, असेही एआयटीएने स्पष्ट केले आहे.‘‘या बाबतीत निर्णय घेण्याइतपत आम्ही अनुभवी आहोत. एस. पी. मिश्रासारखे अनुभवी आणि तज्ज्ञ मंडळी आमच्याकडे आहेत. टेनिस कोर्टबाबत आम्ही लिएण्डर पेससारख्या अनुभवी खेळाडूकडून मार्गदर्शन घेत होतो. पण त्रिपुरा किंवा अन्य ठिकाणी सामना खेळवण्यात यावा, प्रशिक्षक आणि कर्णधार बदलण्यात यावा, अशी मागणी खेळाडू करत असतील, तर आम्ही त्यांना भीक घालणार नाही. कोर्टबाबत आम्ही त्यांच्या सूचना जरूर अमलात आणू, पण त्यांच्या अवाजवी मागण्या मान्य करणार नाहीत,’’ असे एआयटीएचे महासचिव भरत ओझा यांनी सांगितले.
‘‘फेब्रुवारी महिन्यात दक्षिण कोरियाविरुद्ध होणाऱ्या डेव्हिस चषकाच्या लढतीसाठी काही नियम बनवण्यात येणार असून या नियमांच्या करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या खेळाडूलाच भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. कोणताही खेळाडू पुढे न आल्यास, आम्ही हा सामना हरलो असे जाहीर करू. पण खेळाडूंची कोणत्याही प्रकारे हयगय करणार नाही,’’ अशा शब्दांत ओझा यांनी खेळाडूंना सुनावले आहे. संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हिरोन्मोय चॅटर्जी खेळाडूंशी चर्चा करणार आहेत.

Story img Loader