भारतीय कसोटी संघातील फलंदाज चेतेश्वर पुजारा आपल्या शांत आणि संयमी खेळासाठी ओळखला जातो. तोच पुजारा जर वेगात पळत येऊन गोलंदाजी करताना दिसला तर? इंग्लंडमध्ये ससेक्स आणि लिसेस्टरशायरविरुद्धच्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना हे दुर्मिळ दृश्य बघायला मिळाले. चेतेश्वर पुजारा गेल्या काही महिन्यांपासून ससेक्स क्रिकेट क्लबसाठी खेळत आहे. लिसेस्टरशायरविरुद्धच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी त्याने एक षटक गोलंदाजी केली. या षटकामध्ये त्याने आठ धावा दिल्या.

गोलंदाजी करण्याची ही पुजाराची काही पहिलीच वेळ नाही. त्याने यापूर्वीही कसोटी क्रिकेटमध्ये एक षटक गोलंदाजी केलेली आहे. मात्र, प्रदीर्घ काळानंतर त्याला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना बघून क्रिकेट चाहत्यांना नक्कीच आश्चर्य वाटले. पुजाराने टाकलेल्या एका षटकामध्ये लिसेस्टरशायरच्या वियान मुल्डरने त्याला एक चौकारही लगावला.

चेतेश्वर पुराजराने एप्रिल आणि मे महिन्यात ससेक्स संघाकडून क्रिकेट खेळले. या काळात ससेक्ससाठी त्याने दोन द्विशतके आणि दोन शतके झळकावून इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीसाठी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन केले. कसोटी सामना संपल्यानंतर तो आता पुन्हा एकदा ससेक्स संघात सामील झाला आहे. सध्या तो ‘काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन २’मध्ये लिसेस्टरशायरविरुद्ध खेळत आहे.

हेही वाचा – पाकिस्तानच्या सलामीवीराने केली विराट आणि रोहितची तुलना; म्हणाला “विराटमध्ये…”

पुजाराने बीसीसीआय टीव्हीला सांगितले होती की, “अधिकाधिक प्रथम श्रेणी क्रिकेट खेळता यावे म्हणून मी काउंटी क्रिकेट खेळत आहे. माझ्यासाठी हा अनुभव खूप महत्त्वाचा होता. ससेक्सकडून खेळत असताना मला माझा फॉर्म पुन्हा गवसला.”

Story img Loader