महिनाभर चालणार स्पर्धा; १० संघांचा समावेश

इंडियन व्हॉलीबॉल लीगच्या (आयव्हीएल) धर्तीवर राज्यातही व्हॉलीबॉल लीग आयोजित करण्याच्या प्रयत्नांना अखेर अंतिम स्वरूप प्राप्त झाले आहे. राज्यातील खेळाडूंची आर्थिक भरभराट व्हावी आणि हा खेळ अधिक लोकप्रिय व्हावा यासाठी ‘महा व्हॉली’ लीग आयोजित करण्यात येणार आहे. पुढील वर्षी मार्चच्या पहिल्या आठवडय़ात ही स्पर्धा खेळविण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राज्य संघटना आणि आयोजक गोल्डन पिरॅमिड (पुणे) यांच्यात लीग संदर्भात करार झाला.

गेली दोन-एक वर्ष या लीगच्या तयारीसाठी संघटनेकडून प्रयत्न सुरू होते, परंतु काही कारणास्तव त्यात दिरंगाई होत होती. मात्र या लीगबाबतचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून मार्चमध्ये ही लीग सुरू होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या लीगमध्ये दहा संघांचा समावेश संघटनेला अपेक्षित आहे. तसेच नऊ विविध शहरांमध्ये लीगचे सामने खेळविण्याचा मानस व्यक्त करण्यात येत आहे. ‘‘महा व्हॉली लीगमुळे खेळाडूंची आर्थिक उन्नती होणार आहे. खेळाला चांगले दिवस येतील,’’ असा विश्वास राज्य संघटनेचे अध्यक्ष विजय डांगरे यांनी व्यक्त केला.

५० लाख सिक्युरिटी डिपॉझिट

या लीगला अपेक्षेइतके यश न मिळाल्यास खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून आयोजकांकडून ५० लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट घेण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. तसेच या लीगचे थेट प्रक्षेपणही करण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे.

गोव्यातही लीगचे सामने?

महाराष्ट्रात पहिल्यांदा होऊ घातलेली व्हॉलीबॉल लीग सीमोल्लंघन करण्यासाठीही सज्ज झाली असून या लीगचे काही सामने गोव्यातही खेळविण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते. संघटनेचे सचिव बाळासाहेब सूर्यवंशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘‘लीगचे काही सामने गोव्यात खेळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिल्यांदा राज्यातील एखादी लीग बाहेरच्या राज्यात खेळविण्यात येणार आहे. याचा अधिक आनंद वाटतो.’’

Untitled-23