नवी दिल्ली : भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनच्या उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर असून त्याला पाच ते सहा आठवडे मैदानाबाहेर राहावे लागणार आहे. त्यामुळे तो रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत केरळचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. ८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या लढतीत केरळची जम्मू-काश्मीरशी गाठ पडणार आहे.

रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या इंग्लंडविरुद्ध पाचव्या ट्वेन्टी-२० सामन्यात फलंदाजीदरम्यान सॅमसनला दुखापत झाली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू त्याच्या उजव्या हाताला आदळला. त्यानंतर त्याने मैदानातच उपचार घेत फलंदाजी सुरू ठेवली. मात्र, तो क्षेत्ररक्षणासाठी येऊ शकला नाही. उजव्या हाताच्या बोटाला पट्टी बांधून तो सीमारेषेबाहेर बसला होता. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली.

‘‘सॅमसनच्या उजव्या हाताच्या बोटाला फ्रॅक्चर आहे. त्याला पाच-सहा आठवडे मैदानाबाहेर राहावे लागले. त्यानंतरच तो सरावास सुरुवात करू शकेल. तो रणजी लढतीला मुकणार हे स्पष्टच आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील (बीसीसीआय) सूत्राकडून सांगण्यात आले. आता तो थेट ‘आयपीएल’मध्ये खेळताना दिसू शकेल, असेही सूत्राने सांगितले.

मुंबईतील सामन्यानंतर सॅमसन थिरुवनंतपुरम येथील आपल्या घरी परतल्याची माहिती आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पुढील उपचार घेईल आणि तेथील डॉक्टरांकडून परवानगी मिळाल्यानंतरच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकेल.

बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करताना सॅमसनने सात ट्वेन्टी-२० सामन्यांत तीन शतके साकारली होती. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला ही लय राखता आली नाही. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांत त्याला अनुक्रमे २६, ५, ३, १, १६ धावाच करता आल्या. विशेषत: सातत्याने ताशी १४०-१५० किमीच्या वेगाने गोलंदाजी करणाऱ्या जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि साकिब महमूद यांनी उसळी घेणारे चेंडू टाकून त्याला अडचणीत टाकले. पूलचा फटका मारण्याचा मोह सॅमसनला आवरता आला नाही आणि सीमारेषेवर उभ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात झेल देत तो माघारी परतल्याचे या मालिकेत वारंवार दिसून आले.

विश्रांतीसाठी पुरेसा वेळ

भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार असून त्यानंतर चॅम्पियन्स करंडकात सहभाग नोंदवेल. सॅमसन एकदिवसीय संघाचा भाग नसल्याने त्याच्याकडे विश्रांतीसाठी पुरेसा वेळ आहे. ‘आयपीएल’च्या नव्या हंगामाला २१ मार्चपासून सुरुवात होईल. या स्पर्धेत सॅमसन राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करेल.

Story img Loader