जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी निखात झरीन हिने (५४ किलो वजनी गट) सुरेख कामगिरी कायम राखत अल्बेना (बल्गेरिया) येथे सुरू असलेल्या महिलांच्या एआयबीए जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. दुसऱ्या जागतिक सुवर्णपदकाच्या शर्यतीत असलेल्या १७ वर्षीय झरीनने किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.
बँटमवेट प्रकारात खेळणाऱ्या झरीनने उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या डिझायर गाल्ली हिचा पराभव केला. त्यानंतर आंध्र प्रदेशच्या झरीनने युक्रेनच्या विक्टोरिया विर्ट हिला हरवत अंतिम फेरी गाठली. चपळ असणाऱ्या झरीनसमोर विर्ट हिचा निभाव लागला नाही. झरीन हिने सुरुवातीपासूनच आपला नैसर्गिक खेळ करत लढतीवर वर्चस्व राखले होते. तिने आक्रमक खेळ करत जॅब्सचे सुरेख फटके लगावले. पंचांनी एकमताने तिला विजयी घोषित केले.
‘‘सुरुवातीपासून मी आक्रमक पवित्रा अवलंबला होता. प्रतिस्पर्धीकडून मला प्रतिकार सहन करावा लागेल, असे वाटले होते. पण विर्टच्या बचावात्मक खेळाचा मी फायदा उठवला. खेळात सातत्य कायम राखून मी अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले,’’ असे झरीनने सामना जिंकल्यानंतर सांगितले. तिला अंतिम फेरीत चीनच्या युन्झी युआन हिच्याशी लढत द्यावी लागेल. लाईटवेट गटात सिमरनजीत कौर (६० किलो) हिला कझाकस्तानच्या आयदाना अरापबायेव्हा हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. आशा रोका हिला (४८ किलो) कझाकस्तानच्या असिल अस्कारोव्हा हिने हरवले. आता दोघींना कांस्यपदकासाठी लढत द्यावी लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा