बांगलादेशवर ७२ धावांनी मात; हरमनप्रीत, मिताली व वेदाची वेगवान खेळी; अनुजा आणि पूनमचा भेदक माराू
शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने ट्वेन्टी-२० विश्वचषक अभियानाची विजयी सुरुवात केली. बंगळुरू येथे झालेल्या लढतीत भारतीय संघाने बांगलादेशवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. सुरेख सांघिक प्रदर्शन हे विजयाचे वैशिष्टय़ ठरले. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी-२० मालिकेत चीतपट करण्याची किमया करणाऱ्या महिला संघाने घरच्या मैदानावर श्रीलंकेचा धुव्वा उडवला होता. हाच फॉर्म कायम राखत भारतीय संघाने दमदार प्रदर्शनासह छाप उमटवली.
ढगाळ हवामान लक्षात घेऊन बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी या निर्णयाचा फायदा उठवला. कर्णधार मिताली राज आणि वेल्लास्वामी वनिता जोडीने ६२ धावांची खणखणीत सलामी दिली. नहिदा अख्तरने वनिताला बाद करत ही जोडी फोडली. तिने २४ चेंडूंत ७ चौकारांसह ३८ धावांची खेळी केली. भरवशाच्या स्मृती मंधानाला भोपळाही फोडता आला नाही. अर्धशतकाकडे कूच करणाऱ्या मितालीला रुमाना अहमदने बाद करत भारताला धक्का दिला. मितालीने ५ चौकारांसह ३५ चेंडूंत ४२ धावा केल्या. हरमनप्रीत कौर आणि वेदा कृष्णमूर्ती जोडीने चौथ्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी केली. हरमनप्रीतने २९ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावांची आक्रमक खेळी साकारली. रुमानाने हरमनप्रीतला बाद केल्यानंतर वेदाने सामन्याची सूत्रे हाती घेत भारतीय संघ दीडशेचा टप्पा ओलांडेल याची काळजी घेतली. तिने २४ चेंडूंत ३६ धावांची खेळी केली. बांगलादेशतर्फे रुमाना अहमद आणि फाहिमा खातून यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी शरणागती पत्करत नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. निगर सुलताना (२७) आणि शरमीन अख्तेर (२१) या दोघींचा अपवाद वगळता एकीलाही आत्मविश्वासपूर्ण खेळी करता आली नाही. सातत्याने विकेट्स मिळवत भारतीय संघाने बांगलादेशच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. भारतीय संघाकडून अनुजा पाटीलने १६ धावांत २ तर पूनम यादवने १७ धावांत २ बळी घेतले. अन्य गोलंदाजांनी टिच्चून मारा करत या दोघींना चांगली साथ दिली.
वेगवान खेळी साकारणाऱ्या हरमनप्रीतला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय संघाची पुढची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध १९ मार्चला दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : २० षटकांत ५ बाद १६३ (मिताली राज ४२, हरमनप्रीत कौर ४०, वेल्लास्वामी वनिता ३८, वेदा कृष्णमूर्ती ३६; फाहिमा खातून २/३१) विजयी विरुद्ध बांगलादेश : २० षटकांत ५ बाद ९१ (निगर सुलताना नाबाद २७; अनुजा पाटील २/१६, पूनम यादव २/१७)
सामनावीर : हरमनप्रीत कौर.