महाबलीपूरम : कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली यांच्या दिमाखदार कामगिरीच्या बळावर भारतीय महिला-अ संघाने ४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत बुधवारी सहाव्या फेरीत बलाढय़ जॉर्जियावर ३-१ असा सनसनाटी विजय मिळवला.
खुल्या गटात भारताला माजी विजेत्या अर्मेनियाविरुद्ध १.५-२.५ असा पराभव पत्करावा लागला असला, तरी ग्रॅंडमास्टर डी. गुकेशची सातत्यपूर्ण कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने सलग सहावा विजय मिळवला. गुकेशने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना गॅब्रिएल सर्गिसिआनचा पराभव केला. पण, त्याचा विजय भारताला विजय मिळवून देण्यास अपुरा पडला. संघातील बी. अधिबन आणि रौनक साधवानी यांनी पराभव पत्करला.
महिला गटात भारतीय-अ संघाने तगडय़ा जॉर्जियाचे आव्हान अगदी सहज परतवून लावले. ग्रँडमास्टर हम्पीने नाना झाग्नीझेचा ४२ चालींत पराभव केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय मास्टर वैशालीने जावाखशिवलीवर मात केली. ग्रँडमास्टर द्रोणावली हरिका आणि आंतरराष्ट्रीय मास्टर तानिया सचदेव यांनी आपापल्या लढती बरोबरीत सोडवल्या.
अन्य लढतींमध्ये, खुल्या गटात भारत-अ संघाने उझबेकिस्तानविरुद्ध २-२ अशी बरोबरी पत्करली. भारत-क संघाने लिथुआनियाचा ३.५-०.५ असा पराभव केला. महिलांमध्ये भारत-ब संघाने चेक प्रजासत्ताकविरुद्धची लढत २-२ अशी बरोबरीत सोडवली, तर भारत-क संघाने ऑस्ट्रेलियाचा ३-१ असा पराभव केला.