चेंगडू (चीन) : अनुभवी पी. व्ही. सिंधूच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारताच्या युवा महिला खेळाडूंनी उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेला शनिवारी यशस्वी सुरुवात केली. सलामीच्या लढतीत भारतीय संघाने कॅनडाचा ४-१ असा पराभव केला. यात अश्मिता चलिहाने जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या मिशेल ली हिच्यावर विजय मिळवत सनसनाटी निकाल नोंदवला.
डावखुरी अश्मिता जागतिक क्रमवारीत ५३व्या स्थानावर आहे. तिने संयम आणि चिकाटीने खेळ करताना राष्ट्रकुल स्पर्धेतील दोन वेळच्या पदकविजेत्या मिशेलला ४२ मिनिटांत २६-२४, २४-२२ असा पराभवाचा धक्का दिला.
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात आशियाई सांघिक स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघात अश्मिताचा समावेश होता. सिंधूच्या गैरहजेरीत महिला संघाचे नेतृत्व तिच्याकडेच सोपविण्यात आले आहे.