मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने अखेरच्या वन-डे सामन्यात यजमान वेस्ट इंडिज संघावर मात करत मालिकेत बाजी मारली आहे. शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ६ गडी राखून विजय मिळवला. स्मृती मंधानाला सामनावीरचा पुरस्कार मिळाला.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली. विंडीजच्या निम्मा संघ १०० धावांच्या आत माघारी परतला. यानंतर कर्णधार स्टेफनी टेलरचं अर्धशतक आणि अखेरच्या फळीत स्टेसी किंगने फटकेबाजी करत दिलेल्या साथीमुळे विंडीजच्या महिलांनी १९४ धावांपर्यंत मजल मारली. टेलरने ७९ धावा केल्या तर किंगने ३८ धावांची खेळी केली. भारताकडून झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना शिखा पांडे, राजेश्वरी गायकवाड, दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी आपल्या डावाची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची शतकी भागीदारी रचली. या भागीदारीदरम्यानच विंडीजचा पराभव निश्चीत झाला होता. स्मृती मंधानाने ७४ तर रॉड्रीग्जने ६९ धावा केल्या. या दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर पुनम राऊत आणि मिताली राज यांनी फटकेबाजी करत भारताला विजयाच्या जवळ आणून सोडलं. मात्र या दोन फलंदाज फलंदाजही बाद झाल्यानंतर दिप्ती शर्माने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Story img Loader