आज भारतीय महिला बुद्धीबळपटू जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. पण चौसष्ट घरांचे सम्राज्ञीपद मिळवण्यासाठी गरज आहे ती संपूर्ण यंत्रणेनेच त्यांच्यासाठी प्रयत्न करण्याची.
बुद्धिबळात विश्वविजेतेपद मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. पुरुष विभागात भारताच्या विश्वनाथन आनंद याने पाच वेळा विश्वविजेतेपदावर आपली मोहोर नोंदविली. त्याच्या या विजयामुळेच खऱ्या अर्थाने भारतामध्ये बुद्धिबळ युग निर्माण झाले आहे. अलीकडच्या काळात भारतीय महिलांनीही जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे. महिलांच्या विभागात विश्वविजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भारतीय खेळाडूंना साकार करता आलेले नसले, तरी हे विजेतेपद त्यांना खुणावत आहे व त्या दृष्टीने या खेळाडूंनी झेप घेण्याची आवश्यकता आहे.
भारतीय स्त्री म्हणजे चूल व मूल यापुरतेच तिचे विश्व असले पाहिजे, असे एके काळी सांगितले जात असे. मात्र आता काळ खूप बदलला आहे. केवळ क्रीडा क्षेत्र नव्हे तर अनेक क्षेत्रांमध्ये भारतीय महिलांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. क्रीडा क्षेत्रात सायना नेहवाल, मेरी कोम, करनाम मल्लेश्वरी, पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदके मिळवत अतुलनीय कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय पुरुष खेळाडूंना अद्याप ऑलिम्पिक पदक मिळविता आलेले नाही. करनाम हिने कांस्यपदक मिळवीत आपण पोलादी महिला असल्याचे सिद्ध केले आहे. बॅडमिंटनमध्येही पुरुष गटात आपली पाटी कोरी राहिली आहे. सायना हिने कांस्यपदक मिळवीत देशातील बॅडमिंटनची प्रतिमा उंचावली तर तिची सहकारी सिंधू हिने ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनमध्ये अंतिम फेरी गाठणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळविला. जे पुरुष खेळाडूंना जमले नाही ते सिंधू हिने रौप्यपदक मिळवीत दाखविले आहे. मेरी कोम ही केवळ भारतात नव्हे तर जागतिक क्रीडा क्षेत्रातील सुपरमॉम म्हणून प्रसिद्ध झाली आहे. कुस्ती हा केवळ पुरुषांनी मर्दुमकी गाजविण्याचा खेळ नसून आपणही त्यामध्ये वर्चस्व गाजवू शकतो हे साक्षी हिने दाखवून दिले आहे. या खेळाडूंप्रमाणेच भारतीय महिलांनी बुद्धिबळातही चांगला नावलौकिक मिळविला आहे.
कोनेरू हंपी, द्रोणावली हरिका, तानिया सचदेव, मेरी अॅन गोम्स, एस. विजयालक्ष्मी, ईशा करवडे, निशा मोहोता, पद्मिनी राऊत, सौम्या स्वामीनाथन, एस. मीनाक्षी, आकांक्षा हगवणे यासारख्या खेळाडूंनी जागतिक स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. हंपी हिने २०११ मध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तेथे तिला होऊ यिफान हिने पराभूत केले होते. या स्पर्धेखेरीज हंपी हिने तीन वेळा जागतिक स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठली होती. तसेच तिने जागतिक स्तरावरील अनेक ग्रां. प्रि. स्पर्धामध्ये अव्वल यश मिळविले आहे. विजयालक्ष्मी हिला विश्वविजेतेपद मिळाले नसले, तरी हिने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये अजिंक्यपद मिळवत हुकमत गाजविली आहे. हरिका हिने अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सवरेत्कृष्ट महिला खेळाडूचा मान मिळविला आहे. ईशा हिने देखील परदेशातील अनेक स्पर्धामध्ये आपल्या सर्वोत्तम शैलीची छाप पाडली आहे. सौम्या हिने आशियाई स्तराबरोबरच जागतिक स्तरावरील विविध वयोगटांतील स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. आकांक्षा हिने अलीकडेच जागतिक युवा स्पर्धेत तर आशियाई कनिष्ठ गट स्पर्धेत विजेतेपद मिळविले आहे. भारतीय महिलांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतही सोनेरी कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे बुद्धिबळाच्या ऑलिम्पियाडमध्येही उल्लेखनीय यश मिळविले आहे.
अव्वल दर्जाच्या महिला खेळाडूंशी याबाबत चर्चा केल्यानंतर असे दिसून आले की, भारतामध्ये महिलांसाठी विविध स्तरावरील स्पर्धा आयोजित करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या संख्येतही वाढ होत आहे. मात्र अजूनही काही ठिकाणी पुरुष व महिला यांच्यामध्ये पारितोषिके, शिष्यवृत्ती याबाबत तफावत दिसून येत असते. त्याचप्रमाणे विविध सुविधा व सवलतींबाबतही महिलांना अपेक्षेइतकी समानता दिसून येत नाही. पेट्रोलियम, आयुर्विमा, भारतीय विमानतळ प्राधिकरण आदी काही आस्थापनांमध्ये महिला खेळाडूंना नोकरी किंवा शिष्यवृत्ती मिळत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळविणाऱ्या महिला खेळाडूंची संख्या वाढत असल्यामुळे सर्वाना नोकरी किंवा शिष्यवृती मिळत नाही. अन्य आस्थापनांनीही त्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपल्या संस्थेत एक-दोन खेळाडूंना नोकरीची संधी दिली, तर आपोआप आपला नावलौकिक उंचावला जाणार आहे हे या संस्था चालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धासाठी पात्रता पूर्ण करण्याच्या दृष्टीने अव्वल दर्जाच्या खेळाडूंना सतत पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान राखण्याची आवश्यकता असते. हे स्थान टिकविण्यासाठी सतत व्यावसायिक स्पर्धामध्ये किंवा अन्य आंतरराष्ट्रीय ग्रां. प्रि स्पर्धामध्ये त्यांना भाग घ्यावा लागतो. परदेशातील खेळाडू बहुंताश वेळी युरोपातील विविध आव्हानात्मक स्पर्धामध्ये सहभागी होत असतात. आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये वाढ होण्यासाठी त्यांना अशा स्पर्धामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणे अपरिहार्य असते. त्याकरिता जास्तीत जास्त स्पर्धात्मक सराव अनिवार्य असतो. सर्वसाधारणपणे परदेशातील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी भारतीय खेळाडूंना प्रतिवर्षी दहा ते पंधरा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो. भारतामधील प्रत्येक खेळाडूच्या पालकांना ही गोष्ट शक्य नसते. बुद्धिबळाचा प्रसार व प्रचार मोठय़ा प्रमाणावर झाला आहे. प्रायोजकांची संख्या वाढली असली तरीही अव्वल दर्जाच्या खेळाडूंच्या पालकांच्याही आर्थिक मर्यादा असतात. क्रिकेटवर कोटय़वधी रुपयांची उधळण करणारे भरपूर उद्योगसमूह असतात. मात्र बुद्धिबळास असे प्रायोजक मिळणे म्हणजे दिवास्वप्नच असते. प्रसिद्धी व प्रायोजक या एकाच नाण्याच्या दोन गोष्टी असतात. जर खेळाडूंना प्रसिद्धी मिळाली, तरच त्यांच्या प्रायोजकांमध्ये वाढ होऊ शकते. मात्र अजूनही क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन आदी खेळांना व त्यांच्या खेळाडूंना जेवढे प्रसिद्धीचे वलय लाभते तसे वलय बुद्धिबळपटूंना मिळत नाही. त्यातही महिला बुद्धिबळपटूंची कामगिरी उपेक्षितच असते. अलीकडे शासनाकडून या खेळाडूंना चांगल्या सवलती मिळू लागल्या आहेत. मात्र त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना खेळाडू व त्यांच्या पालकांना नाकी नऊ येतात. एक वेळ ही मदत नको मात्र कागदपत्रांकरिता हेलपाटे मारायला सांगू नका अशीच प्रतिक्रिया या खेळाडूंची व त्यांच्या पालकांची असते. काही वेळा शासनाच्या विचित्र नियमांमुळेही महिला खेळाडूंना शिष्यवृत्ती किंवा पुरस्कारांपासून वंचित राहावे लागते. सहसा बुद्धिबळपटूंच्या प्रशिक्षकांना अन्य खेळांमधील प्रशिक्षकांइतकी प्रसिद्धी मिळत नसते. खेळाडूंच्या अव्वल यशामध्ये प्रशिक्षकांचाही मोलाचा वाटा असतो. त्यांचाही उचित गौरव होण्याची आवश्यकता असते. असा गौरव झाला तर आपोआप त्यांनाही आणखी चांगले प्रशिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकते. महिला खेळाडूंच्या विकासाकरिता खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, पालक व शासन यांनी एकत्रितरीत्या प्रयत्न केले पाहिजेत. असे प्रयत्न झाले तर महिलांमध्ये चौसष्ट घरांची विश्वसम्राज्ञी होण्याची किमया भारतीय खेळाडूंकडून साकारली जाईल.
मिलिंद ढमढेरे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा