आशियाई स्क्वॉश अजिंक्यपद स्पध्रेला बुधवारपासून प्रारंभ होत असून, दिपिका पल्लीकलच्या नेतृत्वाखालील भारताच्या महिला संघाला जेतेपद टिकवण्यासाठी खडतर आव्हानाला  सामोरे जावे लागणार आहे, तर सौरव घोषालच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाला पहिलेवहिले जेतेपद प्राप्त करता येऊ शकते.
२०१२मध्ये झालेल्या आशियाई स्क्वॉश अजिंक्यपद स्पध्रेत पल्लीकल, जोश्ना चिनप्पा आणि अनाका अलांकामोनी यांनी हाँगकाँगवर आश्चर्यकारक विजयाची नोंद करीत भारताला प्रथमच जेतेपद मिळवून दिले होते. दुसरे मानांकन लाभलेल्या भारतीय संघाचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला असून, गुरुवारी भारताची सलामीची लढत हाँगकाँगशीच आहे. या गटात चीन, पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश आहे.
भारताच्या पुरुष संघाला अव्वल मानांकन लाभले असून, आशियातील अव्वल स्थानावरील आणि जागतिक क्रमवारीतील १६व्या स्थानावरील घोषालकडून जेतेपदाची खात्री व्यक्त करण्यात येत आहे. घोषालसह हरिंदर पाल संधू आणि २० वर्षीय महेश माणगावकर यांच्यावर भारताची मदार असेल. ‘अ’ गटात समावेश असलेल्या भारताची पहिली लढत बुधवारी इराणविरुद्ध होणार आहे. याशिवाय कतार आणि फिलिपाइन्स संघांचा या गटात समावेश आहे.

Story img Loader