पुरुष आणि मिश्र संघाची कांस्यपदकाची कमाई
रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर सरावासाठी आतुर भारतीय तिरंदाजांनी शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत तीन पदकांची कमाई केली. या यशासह भारतीय तिरंदाजांनी रिओसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.
महिलांमध्ये रिकव्र्ह प्रकाराच्या अंतिम लढतीत सातत्याच्या अभावामुळे भारतीय संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तैपेईच्या संघाने भारतावर ६-२ अशी मात केली. निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये भारतीय संघाला फक्त पाच गुणांची कमाई करता आली. भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. त्यांनी सहा आणि आठ गुणांची कमाई केली. तैपेईच्या संघाने २-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने आपली कामगिरी सुधारत २-२ अशी बरोबरी केली. यानंतर भारतीय संघाने तीन वेळा दहाव्या वर्तुळात अचूक लक्ष्यभेद केला. मात्र त्यापाठोपाठ पाच आणि आठ गुणच मिळवता आल्याने भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा मावळल्या.
पुरुषांमध्ये रिकव्र्ह प्रकारात प्ले-ऑफच्या लढतीत अतन्यू दास, जयंत तालुकदार आणि मंगल सिंग चांपिआ यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने इंग्लंडच्या संघाचा ६-० असा धुव्वा उडवत कांस्यपदकावर नाव कोरले. दीपिका कुमारी आणि अतन्यू दास जोडीने कोरियाच्या अरुम जो आणि सेआँग चेऊल पार्क जोडीवर ५-४ अशा विजयासह कांस्यपदक पटकावले. शूटऑफमध्ये मुकाबल्यात १८-१८ अशी बरोबरी झाली मात्र दीपिका व अतन्यू जोडीचा लक्ष्यभेद नवव्या बिंदूच्या नजीक असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.