मस्कत : गोलरक्षक निधीच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर भारतीय मुलींच्या संघाने कनिष्ठ गटाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यातील १-१ अशा बरोबरीनंतर भारताने चीनचा शूटआऊटमध्ये ३-२ असा पराभव केला. या कामगिरीने भारतीय मुलींच्या संघाने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

नियोजित वेळेतही चीनच्या आक्रमणे रोखून धरताना निधीने सामना बरोबरीत सोडवला. जिनझुआंगने ३०व्या मिनिटाला चीनचे खाते उघडले. त्यानंतर उत्तरार्धात ४१व्या मिनिटाला कनिका सिवचने भारताला बरोबरी साधून दिली. शूटआऊटमध्ये साक्षी राणाने भारताची पहिली संधी यशस्वी केली. त्यानंतर निधीने चीनचा पहिलाच प्रयत्न फोल ठरवला. मात्र, भारताच्या मुमताज खानचाही प्रयत्न अयशस्वी ठरला. हाओ गुओटिंगने चीनला बरोबरी साधून दिली. भारताच्या सुनेलिता टोप्पोने अखेरची संधी साधून भारताचा विजय साकार केला.

Story img Loader