भारतीय महिला कबड्डी संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे हिचा विश्वास
कबड्डीच्या नव्या नियमांनुसार ज्या संघाला उत्तम रणनीती आखता येईल तोच संघ जिंकेल, ही यशाची गुरुकिल्ली असेल. आम्ही या नियमांनुसार गेली दोन वष्रे खेळत आहोत. त्यामुळे अन्य संघांच्या तुलनेत आमचा संघ वरचढ ठरेल, असा विश्वास भारतीय महिला संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रेने व्यक्त केला आहे. गोरगान (इराण) येथे २३ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पध्रेत अभिलाषाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सहभागी होणार आहे. या स्पध्रेतील आव्हानांबाबत तिच्याशी केलेली खास बातचीत-
प्रथमच भारताचे नेतृत्व करते आहेस, काय भावना आहेत?
भारताचे कर्णधारपद मिळणे हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का ठरला, पण प्रथमच मिळालेले हे कर्णधारपद सुवर्णपदकासह सिद्ध करता आले पाहिजे. सर्व खेळाडूंना विजेतेपदाच्या लक्ष्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर असेल. आतापर्यंत भारताच्या प्रतिनिधित्वाचा अनुभव गाठीशी आहे. आता नेतृत्व करताना माझ्या भारतासाठी विजेतेपद मिळवून द्यायचे आहे. या संघात नव्या खेळाडूंचा भरणा अधिक असल्यामुळे निकाल धक्कादायक ठरू शकतात, असे काही जणांचे म्हणणे आहे. परंतु हा संघ आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करील, यावर माझा विश्वास आहे.
या स्पध्रेत कोणत्या संघांची विशेष आव्हाने असतील?
इराण आणि कोरिया हे संघ प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पध्रेत ताकदीने उतरतात. या संघांना सामोरे जाणे आव्हानात्मक ठरेल. या वेळी इराणच्या संघातसुद्धा बदल दिसून येत आहेत. गझल खलाजसारखी त्यांची महत्त्वाची चढाईपटूसुद्धा या संघात नाही. त्यामुळे इराणचा संघ तसा नवा वाटत आहे. कोरियाचा संघ त्या तुलनेत अधिक बलवान आहे. थायलंडच्या संघातसुद्धा फारसे बदल दिसत नाहीत.
तगडय़ा प्रतिस्पध्र्याविरोधात कोणती रणनीती निश्चित करण्यात आली आहे?
प्रशिक्षक बनानी साहा यांच्याशी माझी रणनीतीबाबत गांभीर्याने चर्चा झाली आहे. कर्णधारपद मिळाले, तेव्हापासूनच विचारप्रक्रिया सुरू झाली होती. तिसरी चढाई आणि अव्वल पकड यांच्यासारख्या नव्या नियमांसह भारतीय महिला संघ आणि अन्य संघसुद्धा प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पध्रेत खेळणार आहे. २०१४ मध्ये झालेली आशियाई क्रीडा स्पर्धा आणि मागील वर्षी झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत कबड्डीसाठी जुन्या नियमांचा अवलंब झाला होता. प्रो कबड्डी आणि दोन राष्ट्रीय कबड्डी स्पर्धाचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. त्यामुळे भारतीय संघ यात वरचढ आहे.
भारतीय संघबांधणीबाबत काय सांगशील?
नव्या चढाईपटूंचा भरणा असल्यामुळे ते यश मिळवतील, ही आम्हाला खात्री आहे. मात्र बचाव अधिक सक्षम हवा. डावी बचावरक्षक प्रियांकावर आमच्या बचावाची मदार असेल. माझ्यासह पायल चौधरी, साक्षी कुमारी, प्रियांका आक्रमणाची धुरा सांभाळू. समोरच्या संघाला भारतीय संघाचा अभ्यास करून रणनीती आखण्याआधी काही दिवस निघून जातील.
सोनीपतच्या विशेष शिबिरात संघाची तयारी कशा प्रकारे झाली?
काही जण प्रथमच भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. प्रशिक्षकांसोबत आम्ही संघाची उत्तम तयारी केली आहे. भारतीय संघाची भीती बाळगूनच प्रतिस्पर्धी संघ खेळणार आहे. त्यामुळे दडपण घेऊ नका. परंतु अतिआत्मविश्वाससुद्धा बाळगू नका, अशा शब्दांत अनुभवी प्रशिक्षक बलवान सिंग यांनीसुद्धा आमचा आत्मविश्वास उंचावला.
प्रथम भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. अनुभवी खेळाडूंचे आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते आहे. यू-टय़ूबवर काही आंतरराष्ट्रीय सामने पाहिले आहेत. माझी बहीण मीनल जाधव पश्चिम रेल्वेकडून खेळते. तिच्यामुळेच मी कबड्डीला प्रारंभ केला. कालांतराने मलासुद्धा हा खेळ आवडायला लागला. मी एकमेव राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा खेळली आहे. परंतु महाकबड्डी लीगचा अनुभव माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. ही तर सुरुवात आहे, अजून भरपूर पल्ला गाठायचा आहे.
– सायली जाधव, भारताची कबड्डीपटू