रांची : सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्याच्या ध्येयापासून आता भारतीय महिला हॉकी संघ केवळ एक विजय दूर आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज, गुरुवारी भारताचा जर्मनीशी सामना होणार आहे. या सामन्यातील विजय भारतीय संघाला पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट मिळवून देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पात्रता स्पर्धेत पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय महिला खेळाडूंनी कमालीच्या जिद्दीने उर्वरित सामन्यांत खेळ केला आणि उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. भारतासमोर जर्मनीचे तगडे आव्हान असले, तरी ते परतवून लावण्यासाठी भारताच्या खेळाडू सज्ज झाल्या आहेत. त्यासाठी भरीव सांघिक कामगिरीचा भारताचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>> आशिया चषक फुटबॉल स्पर्धा : भारतासमोर उझबेकिस्तानचे आव्हान!

या स्पर्धेतून पहिले तीन संघ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे अंतिम फेरी गाठून गुरुवारीच ऑलिम्पिक पात्रतेचे उद्दिष्ट गाठायचे असा भारतीय खेळाडूंचा मानस आहे. भारतीय संघ हा सामना हरल्यास त्यांना तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीतून आणखी एक संधी मिळेल. मात्र, भारतीयांना ही वेळ येऊच द्यायची नाही.

जर्मनीला रोखण्यासाठी भारतीय बचाव फळी तयार आहे. गोलरक्षक सविता पुनियासह उदिता, मोनिका आणि निक्की प्रधान यांनी गेल्या दोन सामन्यांत दाखवलेला बचाव सर्वोत्तम होता. गोलकक्षाच्या बाहेरच प्रतिस्पर्ध्यांच्या चाली रोखून धरण्याचे काम या फळीचे असेल. मध्यरक्षक सलिमा टेटे, नेहा गोयल या दोघांनी गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याची चांगली तयारी दाखवली आहे. यातही चेंडूचा ताबा मिळवून तो खेळवत नेताना सलिमाचा वेग लक्षात राहणारा ठरत आहे. या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी लालरेमसियामी, संगीता कुमारी, ब्युटी डुंग डुंग, नवनीत कौर ही आघाडीची फळी सज्ज असेल.

अशा सगळ्या नियोजनानंतरही भारतीय महिला खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. हीच एकमेव उणीव सध्या भारतीय संघात दिसत आहे.

आम्ही जर्मनीच्या खेळाचा अभ्यास केला आहे. यापूर्वी आम्ही त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ केला आहे. अलीकडेच स्पेनमध्ये आम्ही या संघाविरुद्ध खेळलो होतो. त्यांच्याकडे गुणवान आणि कौशल्यपूर्ण खेळाडूंची संख्या मोठी आहे. मात्र, आम्ही सांघिक ताकद एकवटून खेळ केला, तर त्यांना रोखू शकतो. – यान्नेक शॉपमन, भारतीय संघाच्या प्रशिक्षक

● वेळ : रात्री ८ वा.

● थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian women s hockey team to face germany today for olympic qualifier zws